ऑनलाइन राज्यस्तरीय गणित कार्यशाळेत 11 हजार शिक्षकांनी घेतला सहभाग


भुसावळ : जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटीस्ट, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब, राजकोट (गुजरात) व राज्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन वेबीनार दोन दिवसीय राज्यस्तरीय गणित कार्यशाळा-खेळ मनोरंजनातून सहज गणित 2020 नुकतीच झाली. कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी 11 हजार शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग घेतला तर दुसर्‍या दिवशी साडेसात हजार शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. तर या कार्यशाळेला 267 वेळा शिक्षकांनी शेअर केले व सहा हजारांपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या. संपूर्ण राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेला राज्यस्तरीय गणित कार्यशाळा ऑनलाइन वेबिनार एकमेव असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन डॉ. कपिल पाटील, डॉ. टी.पी. शर्मा (एनसीआरटी,नवी दिल्ली) यांनी केले. तर दुसर्‍या दिवसाच्या वेबिनारचे उद्घाटन तज्ञ मार्गदर्शक मीना सुरेश यांनी केले.

यांनी केले मार्गदर्शन
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब राजकोटचे चेअरमन डॉ. चंद्रमोळी जोशी, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट गुजरातचे डायरेक्टर डॉ. मनोज जवानी यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी डॉक्टर संजीव कुमार (डायरेक्टर नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट हिमाचल प्रदेश), एस.वी बुर्ली (डायरेक्टर नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट कर्नाटक) यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षकांसाठी सुद्धा वेबिनार असावा, मनोरंजनातून सहज व सोपे गणित विद्यार्थ्यांना कसे शिकवावे याचे ज्ञान व प्रशिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने ही संकल्पना जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, सहसचिव संदीप पाटील यांच्यामार्फत तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या टीम कडे आली. कार्यशाळा समन्वयक म्हणून योगेश इंगळे, जीवन महाजन, गोविंदा ठाकरे, अजित चौधरी, प्राजक्त झावरे यांनी काम पाहिले. तर जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या सर्व सदस्यांनी यात परिश्रम घेत योगदान दिले. या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत गणितज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ राज्यभरातील शिक्षकांनी घेतला. आत्मनिर्भर भारत या अभियानानुसार स्वतः आत्मनिर्भर बनून देशाची, राज्याची व आपल्या शाळेची आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी पुढील काळातही राज्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या टीमकडून विविध विषयांवर वेबिनार आयोजित होतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !