1262 लाख टन कांद्याची बांग्लादेशात निर्यात
1 मे ते 10 जुलै या काळात मध्य रेल्वेतील भुसावळ, सोलापूर विभागाने गाठला महत्त्वाचा टप्पा
भुसावळ : रेल्वेने 55 मालगाड्यांच्या माध्यमातून बांग्लादेशात एक हजार 262 लाख टन कांद्याची निर्यात केली आहे. मध्य रेल्वेने मे ते 10 जुलैपर्यंत 55 मालगाड्यांद्वारे कांद्याची बांग्लादेशात वाहतूक केली. भारतात कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध महाराष्ट्रातील नाशिक-मनमाड-कोपरगाव या भागातील शेतकरी कांद्याच्या निर्यातीमुळे यंदा समाधानी आहेत. शिवाय, शेतकरी, निर्यातदार, रेल्वे आणि बांग्लादेशसाठी अनुकूल स्थिती आहे.
भुसावळ विभागातून कांद्याची वाहतूक
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेने बांगलादेशात कांद्याची निर्यात सुरू केली. एक हजार 262 लाख टन कांद्याने भरलेल्या 55 मालगाड्या मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून, तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव, येवलेा स्थानकांमधून बांग्लादेशातील दर्शना, रोहनपूर, बिरोले आणि बेनापोल येथे पाठवण्यात आल्या. 6 मे रोजी लासलगाव ते दर्शना (बांग्लादेश) येथे पाठवलेल्या पहिल्या रॅकपासून कांदा निर्यातीची सुरुवात झाली. मे महिन्यातच कांद्याच्या 27 मालगाड्यांची निर्यात करण्यात आली. जूनमध्ये 23 आणि जुलैमध्ये आतापर्यंत 5 मालगाड्या भरून कांदा बांग्लादेशात रवाना करण्यात आल्या.
मनमाडहूून सर्वाधिक निर्यात
ठरवून दिलेल्या 55 पैकी 13 मालगाडया मनमाडहून, निफाडहून 11, येवले येथून 10, खेरवाडी येथून 8, नाशिकहून 7, लासलगाव येथून 5 आणि कोपरगाव येथून एक रेल्वे बांग्लादेशला रवाना करण्यात आली. मध्य रेल्वेने माल वाहतूक करणार्यांशी नियमितपणे घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकांच्या परीणामस्वरूप बांग्लादेशात कांद्यांची निर्यात समाधानकारक झाली आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून माल वाहतुकदारांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. लोडिंग दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशानुसार फिजिकल डिस्टन्सिंगचे आणि निर्जंतुकीकरणाचे उपाय योजले जात आहेत.

