देशभक्तीपर गीतांनी साकळीत जागवली सामाजिक एकोप्याची भावना


यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडेंचा धार्मिक एकतेबाबत अभिनव प्रयोग

यावल : तालुक्यातील साकळी येथे किरकोळ कारणावरून गावात काहीशी अशांतता निर्माण झाल्यानंतर सामाजिक भान राखत यावलचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सामाजिक एकोपा कायम टिकवण्यासाठी व लोकांमध्ये धार्मिक एकतेबाबत जनजागृती होण्यासाठी मंगळवारी आपल्या पोलिस प्रशासनातील कर्मचार्‍यांसह रूट मार्च काढल. रूट मार्चचे वेगळे वैशिष्ट्य सांगावयाचे झाल्यास पोलिस वाहनावर लाऊड स्पीकरद्वारे परमपूज्य साने गुरुजी यांचे ‘खरा तो एकची धर्म – जगाला प्रेम अर्पावे’ हे प्रार्थना गीतही ऐकवण्यात आले शिवाय पोलिस निरीक्षक धनवडे हे स्वतः माईक हातात घेऊन वेगवेगळ्या धार्मिक, महामानव व विविध राष्ट्र पुरुषांबद्दल माहिती देत गावातील सर्व धर्मीय बांधवांनी गावात भाईचारा टिकवण्याबाबत आवाहन केले शिवाय सर्वांनी एकजुटीने राहिण्याबाबत संदेशही दिले. एकमेकांच्या धर्माचा आदर व सन्मान केल्ययानंतरच आपल्या गावाची आदर्श अशी धार्मिक एकता मजबूत होईल व गावाचा धार्मिक एकतेचा सुगंध सर्वत्र देशभर दरवळेल यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्रीत गुण्या-गोविंदाने राहणे गरजेचे असल्याचा मौलिक संदेशही त्यांनी दिला.

निरीक्षकांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक
सध्या कोरोना या आजाराने गावात थैमान घातले असून गावाच्या दृष्टीने ही फार मोठे चिंतेची बाब बनली आहे. त्यातच गावात काही किरकोळ कारणामुळे अशांततेचे वातावरण निर्माण झालेले असल्याने गावात अप्रिय घटना टळावी शिवाय गावाची एकता अखंड अबाधीत राहण्यासाठी पोलिस निरीक्षकांनी राबवलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. रुट मार्चच्या दरम्यान धनवडे यांनी गावातील शाळाकरी मुलांकडून ‘सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा’ यासारखी काही देशभक्तीपर गीते म्हणून घेतली. तर काही नागरीकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलिस निरीक्षक धनवडे यांच्या संकल्पनेतील या आगळ्या-वेगळ्या व धार्मिक एकता जपण्याबाबतच्या अभिनव प्रयोगाचे गावात सर्वत्र नागरीकांकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !