भुसावळात शाळांकडून फी भरण्याची सक्तीमुळे शिवसेना-युवा सेना आक्रमक
भुसावळ : कोरोनामुळे देशभरात अनलॉक सुरू असतानादेखील अनेक शाळांकडून पालकांसह विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागू लागले असून या संदर्भातील असंख्य तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्यानंतर विभागाने सर्व मंडळांच्या इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळांसाठी सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये अनलॉकच्या काळात कुठल्याही शाळेने विद्यार्थी/पालकांवर फी भरण्याची सक्ती करू नये, असे स्पष्टपणे बजावण्यात आले असताना शहरातील काही शाळा आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याने शिवसेना हा प्रश्न उचलून धरत दोषी शाळांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शासन परीपत्रकाला भुसावळात हरताळ
या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळातदेखील काही शैक्षणिक संस्था/शाळा, विद्यार्थी/पालकांना फी भरण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करू नये. लॉकडाऊन संपल्यानंतर फी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तरीसुद्धा भुसावळ शहरातील अनेक विद्यालयाने ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून फी वसुली सुरू केली आहे.
विद्यार्थ्यांना ग्रुपबाहेर काढले
भुसावळात इयत्ता बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून व्हाटसअॅप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. पालकांनी शिवसेनेकडे तक्रार केल्यानंतर भुसावळ शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकार्यांनी मंगळवार, 14 जुलै रोजी भुसावळ गट शिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. फी साठी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, पुस्तके व शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्यासाठी सक्ती करणे चुकीचे आहे. अश्या शाळांच्या मान्यता रद्द करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी कळविले आहे. प्रसंगी उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, युवासेना तालुकाप्रमुख हेमंत बर्हाटे, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोझ तडवी, मोहसीन तडवी, जावेद पटेल उपस्थित होते.

