फैजपूर शहरात तीन दिवसीय जनता कर्फ्यूला सुरुवात
फैजपूर : नगरपरीषद प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेमध्ये जनता कर्फ्यूबाबत प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली व त्यावेळी शहरात कोरोना नियंत्रणासाठी 14 ते 16 जुलै दरम्यान आठवडावर जनता कर्फ्यू पाळण्याबाबत एकमत झाले होते. त्यानुषंगाने मंगळवारपासून शहरात जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला होता मात्र सर्वांच्या संमतीने तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्यापारी बांधव व शहरवासीयांनी आपल्या समस्या मुख्याधिकार्यांकडे सोमवारी लेखी निवेदनाद्वारे समस्या मांडल्या. याप्रसंगी नगरपरीषद सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये व्यापारी बांधव व शहरवासीयांनी सात दिवसांच्या बंद ऐवजी तीन दिवसीय बंदसाठी सहमती दर्शवली. यावर सर्वांच्या सहमतीने मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी 14 ते 16 जुलैदरम्यान सलग तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. जनता कर्फ्यूमध्ये दवाखाने, मेडिकल, दूध व कृषी दुकाने सुरू राहणार असून अन्य व्यवसाय तसेच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी व समस्त शहरवासीयांनी कोविड 19 च्या प्रशासनाच्या सर्व आदेशानुसार कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून पहिल्या दिवशी जनता कर्फ्यू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर एरव्ही गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

