न्हावी ग्रामीण रुग्णालयात लोकसहभागातून 30 बेडची ऑक्सिजन यंत्रणा उभारणार
फैजपूर : कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव प्रतिदीन वाढत असून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासणार असल्याने फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी ही सुविधा लोकसहभागातून होण्याबाबत आवाहन केले होते. फैजपूर शहरातील सहकारी संस्था व नगरसेवकांसह कार्यकर्ते यांनी या आवाहनास प्रतिसाद देत न्हावी ग्रामीण रुग्णालयात सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रांताधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक
प्रांताधिकारी थोरबोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या यंत्रणेला लागणारा खर्च श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सातपुडा पतसंस्था व देवदास तुकाराम चौधरी सह पतसंस्था यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार तर फैजपूरचे 14 नगर सेवक यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार 500 रुपये यावल तालुका मेडिकल असोसिएशन यांच्याकडून 11 हजार, वसंतराव पाटील औद्योगिक वसाहत व अंबिका दूध उत्पादक सोसायटी, नितीन नेमाडे हे ही निधी देणार आहे. फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडून दहा हजार, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने 10 हजार व यावल शेतकी संघाकडून पाच हजारांमाणे निधी उभारण्याचे काम करण्यात आले. मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, नगरसेवक हेमराज चौधरी, मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, सातपुडा व्हा.चेअरमन चंद्रशेखर चौधरी, पांडुरंग सराफ यांचे निधी उभारण्यास सहकार्य लाभत आहे. हे काम ग्लोबल एनर्जी कंपनी, पुणे यांना देण्यात आले ते आठवडाभरात पूर्ण होणार असल्याचे नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले. या बैठकीस मान्यवरांसह तहसीलदार जितेंद्र कुंवर, नरेंद्र नारखेडे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य भरत महाजन, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, सराफ, चंद्रशेखर चौधरी, हेमराज चौधरी, अनिरूध्द सरोदे उपस्थित होते.

