श्री क्षेत्र मनुदेवीचा धबधबा खळाळला
यावल : सातपुड्याच्या नयनरम्य वातावरणातील श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावरील धबधबा हा बुधवारी रात्री पासून ओसंडू लागला आहे. लॉकडाऊनमुळे मंदीर परीसरात भाविकांना येण्यास बंदी असून सातपुड्यात जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे यंदा पहिल्यांदाच हा धबधबा पर्यटक व भाविकांविना कोसळत आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना वेगळे करणार्या सतपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य परीसरात श्री क्षेत्र मनुदेवी हे खान्देशवासीयांचे कुलदैवत वसले आहे.
मनुदेवीचे प्राचीन हेमांडपंथी मंदिर
जळगाव जिल्ह्यातील यावल-चोपडा महामार्गावर उत्तरेस असलेल्या कासारखेडे-आडगाव गावापासून साधारणत: आठ किलोमीटर मनुदेवीचे प्राचीन हेमांडपती मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूला पर्वतराजी आणि हिरवळीने नटलेल्या परिसर आहे. मंदिरच्या समोर असलेल्या सुमारे 400 फूट उंचीच्या कड्यावरून कोसळणारा कवठाळ नदीचा मनमोहक धबधबा भक्तांना आलेला प्रवासातील थकवा क्षणात नाहीसा करतो.
पाण्याचा वेग प्रचंड
दरवर्षी मंदिर संस्थान या धबधब्याखाली सिमेंट काँक्रेटचे तळे बांधतात. धबधब्याच्या पाण्याच्या वेगाने ते धबधब्याखाली सुमारे 12 ते 15 फूट खोल खड्डा तयार होत असतो. सध्या धबधब्याखाली जाण्यास बंद करण्यात आली आहे.
सहा ते सात महिने ओसंडतो धबधबा
या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे सातपुड्यातील पर्वतरांगेतील पाणलोट क्षेत्र सुमारे 300 ते 350 हेक्टर आहे. जुलै महिन्यात ओसंडणारा हा धबधबा तब्बल सहा ते सात महिने ओसंडत राहतो.

