भुसावळात महावितरण कार्यालयाला शिवसैनिकांचा कुलूप ठोकण्याचा इशारा
अतिरिक्त वीज बिल व खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरीक हैराण
भुसावळ : वारंवार सूचना देऊनसुद्धा भुसावळ विभागात बसवलेल्या जीनस कंपनीच्या वीज मीटरमुळे ग्राहकांना अतिरीक्त वीज बिल पाठवले जात आहे. एक वर्षांचा कालावधी होऊनसुद्धा सरासरी देयके मिळाली, 600 ग्राहकांना तर दुसर्याच ग्राहकांची देयके दिली गेली असून वर्षभरापासून या चुका घडत आहे. नागरीकांची संचारबंदीत आर्थिक परीस्थिती हाताबाहेर गेली असून जीनस कंपनीचे वीज मीटर गतीने फिरले आणि ग्राहकांना अवाजवी बिल आले. त्यात वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा मनस्ताप वाढवणारा आहे. मान्सूनपूर्व कामे जून जुलैमध्ये करीत महावितरणने दर शनिवारी मेंटेनन्सच्या नावाखाली चार-पाच तास वीजपुरवठा खंडित ठेवला आणि लाखो रुपये खर्च केले, परंतु रीमझिम पावसात दोन-दोन तास बत्ती गुल होत असल्याने गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने व पदाधिकार्यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला.
तक्रारीचा निपटारा न झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा
जळगाव विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना अनेक वेळेस तक्रार करूनसुद्धा त्यांनी मुद्दाम या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, विभागप्रमुख अमोल पाटील, लोकेश वाणी यांनी ि23 ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन यावेळेस दिली असून तक्रारीचा निपटारा न झाल्यास महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्राहकांचा मनस्ताप वाढवणारी देयके
जुना सातारा, खळवाडी परीसरातील भरत दिनकर पाटील यांना ऑगस्ट 2019 पासून दुसर्याच ग्राहकाचे साधारण 5000 रुपये बिल देयकात वाढीव आले. एक वर्षापासून तीन चार वेळेस अर्ज सादर करून सुद्धा देयकात दुरुस्ती केली नाही. श्रीनगर भागातील टोपेश महाजन व प्रदीप हिरामण राणे यांना एक वर्षपासून दुसर्याच ग्राहकाचे वीज देयक दिले आहे कारण मीटर नंबर व ग्राहक क्रमांक यात अपडेट केलीच नाही व दर महिन्यात सरासरी देयक असल्याने मनस्ताप वाढला. काशीराम नगर भागातील लक्ष्मण पाटील यांच्या नावाने असलेल्या देयकात वापर न केलेल्या युनिटची तीन हजार 500 रुपये रक्कम वाढवुन दिली आहे. कॉन्ट्रॅक्ट संपला असतांनासुद्धा जीनस कंपनीच्या चुकीला महावितरण अधिकारी पाठीशी घालत आहे म्हणून अश्या प्रकारच्या चुकीच्या कामांना प्रोत्साहन मिळत आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
शिवसेनेने अनेक तक्रारी सोडवल्या
महावितरणच्या चुकीमुळे नागरीक सरकारला जबाबदार ठरवतात, राज्य सरकार पारदर्शकपणे कार्य करीत असून यापुढे महावितरणच्या चुकीमुळे ठाकरे सरकारवर टीका झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. मागील महिन्यात नागरिकांच्या वीज बिलाच्या अनेक तक्रारी शिवसेनेने सोडवल्या असून यापुढेही ग्राहकांनी शिवसेना पदाधिकार्यांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे.

