20 लाखांच्या सुपारीच्या संभाषणाने पोलिस दलही हादरले
पुण्यातील अनोळखी व अनडिटेक्ट खुनाच्या अनुषंगाने तपासाला वेग : पुणे व शहर ग्रामीण पोलिसांसह मलकापूर पोलिसांना दिले पत्र
भुसावळ : भुसावळ रेल्वे कब्रस्थानाजवळ गत काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी एक-एक कडी जोडून आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांच्या हाती एक धक्कादायक ऑडीओ क्लीप लागली आहे. यात दोन व्यक्तींमध्ये 20 लाखांच्या सुपारीबाबत संभाषण झाले असून पुण्यातील व्यक्तीशी निगडीत ही सुपारी असल्याने पोलिस दल हादरले आहे. घातपाताची शक्यता लक्षात घेता भुसावळ पोलिसांनी पुणे शहर व ग्रामीण तसेच मलकापूर पोलिसांना या संदर्भात पत्र दिले आहे. संबंधीत हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात उकल झाली नसल्यास वा एखादा व्यक्ती मयत असल्यास वा त्याची ओळख पटली नसल्यास संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.
20 लाखांच्या सुपारीने पोलिस दल हादरले
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दोन व्यक्तींमध्ये संभाषण झाले असून त्यात पुण्यातील व्यक्तीची 20 लाखात सुपारी मिळाल्याचा उल्लेख आहे. मोठ्याने बोलणारी व्यक्ती ही हिंदी आवाजात समोरील व्यक्तीला 20 पेटींचे आपल्या काम भेटल्याचे सांगत असून तुझ्याकडे सध्या काम नसल्याने आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी ही संधी ठरत असल्याचे सांगत आहे शिवाय तुला एकट्याला हे काम करावयाचे नसून त्यात मी देखील सोबत असल्याचे सांगत आहे. पुण्यातील व्यक्तीला मारून टाकून जालना जिल्ह्यात टाकण्याचा तसेच मलकापूर येथील कामाचाही उल्लेख आहे. या घटनेत गावठी कट्ट्याचा वापर झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी या अनुषंगाने 21 जानेवारी 2020 नंतर खुनाचे उघड न झालेले गुन्हे, मिसींग झालेल्या व्यक्ती आदींबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली आहे शिवाय पुणे शहर व ग्रामीण पोलिसांसह मलकापूर पोलिसांनाही पत्र देण्यात आले आहे.

