रावेर विधासभेसाठी विद्यमान आमदारांसह आठ जण इच्छूक


अनिल चौधरी मात्र मुलाखतीपासून दूर ; उमेदवारीकडे लागले लक्ष

रावेर- रावेर-यावल विधासभा मतदार संघासाठी विद्यमान नामदार हरीभाऊ जावळे यांच्यासह आठ जणांनी भाजपाच्या कोअर कमेटीला इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या. यंदा विधासभेचे तिकीट कोणाला मिळते ? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे तर कार्यकर्त्यांनी मात्र आपल्याच नेत्यांना तिकीट मिळणार असल्याचे दावे-प्रतिदावे सुरू केले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर नामदार असलेले जावळे हेच पक्षात वरीष्ठ आहेत. दरवेळी नवीन आमदार देणार्‍या मतदारसंघात यंदा आमदार जावळेंना पुन्हाच तिकीट मिळणार की पक्ष अन्य कुणाला तिकीट देणार? याबाबत आता चर्चा झडण्यास सुरुवात झाली आहे.

तिकीट मिळालेल्या उमेदवाराचे काम करण्याची ग्वाही
रावेर मतदारसंघातून तब्बल आठ इच्छूकांनी निवडणूक लढवण्यास पसंती दर्शवती आपापल्या मुलाखती दिल्या आहेत. इच्छूकांमध्ये विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे, उद्योजक श्रीराम पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, डॉ.कुंदन फेगडे, भरत महाजन, डॉ.निलेश महाजन यांचा समावेश आहे. पक्ष ज्याला अधिकृतरीत्या उमेदवारी देईल त्या उमेदवाराचा प्रचार रकण्याची ग्वाही या उमेदवारांनी दिली आहे. विशेष म्हणजे गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या अनिल चौधरी यांनी इच्छूकांमधून मुलाखत न दिल्याने ते अपक्ष लढतील, असे संकेत आहेत.

लेवा समाजाचे मतदान निर्णायक
रावेर-यावल मतदारसंघात एकूण दोन लाख 95 हजार 735 मतदार असून यात लेवा पाटील समाज सुमारे 63 हजार 251, मुस्लिम समाजाचे 48 हजार 958, मराठा समाज 44 हजार 864 मतदार, बुध्दिष्ट समाजाचे 38 हजार 842, कोळी समाजाचे 22 हजार 513 तर तडवी समाजाचे 18 हजार 752 मतदार आहेत तर अन्य समाजाचे 56 हजार 565 मतदान आहे.


कॉपी करू नका.