बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला न्यायालयाने सुनावली 12 पर्यंत न्यायालयीन कोठडी
अल्पवयीन तिघा संशयीतांची पोलिसांनी केली डीएनए चाचणी : सोमवारपर्यंत अहवालाची आशा
भुसावळ : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरणी अटकेतील आरोपी महेंद्र सीताराम बारेला (19, केर्हाळा, ता.रावेर) याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोरले यांनी त्यास 12 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने कुर्हाडीने घालून 13 वर्षीय बालिकेसह तिच्या अन्य तीन भावंडांची हत्या केल्याची घटना 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती.
एकाच कुटुंबातील चौघा भावंडांची झाली होती हत्या
रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यालगत चार भावंडांची हत्या केल्याची घटना 15 ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी तांत्रिक मुद्यांच्या तसेच परीस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी महेंद्र बारेला याला अटक करण्यात आली होती. आरोपीची शनिवारी कोठडी संपल्याने त्यास भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 12 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयात तपासाधिकारी सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा उपस्थित होते. आरोपीतर्फे अॅड.सत्यनारायण पाल यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षातर्फे अॅड.सोनवणे यांनी काम पाहिले.
सोमवारपर्यंत डीएनए अहवालाची आशा
सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेतील आरोपीसोबत आणखी काही संशयीत असल्याची माहिती आहे त्यामुळे तांत्रिक मुद्यांच्या आधारे पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. हत्याकांडप्रकरणी सुरूवातीला पोलिसांनी प्रथम तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले होते. तिघांची डीएनए चाचणी करण्यात आली असून सोमवारपर्यंत त्याचा अहवाल येईल व सर्व स्पष्ट होईल, असे सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा म्हणाले.

