भुसावळातील ट्रामा केअर सेंटरला पूर्ववत नॉन कोविड सुविधा पुरवा


भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

भुसावळ : भुसावळातील ट्रामा केअर सेंटरला पूर्ववत नॉन कोविड सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितू पाटील यांनी केली. निवेदनाचा आशय असा की, भुसावळातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या कोरोना संक्रमीत रुग्ण असून गत आठवड्यापासून त्यांची संख्या चार ते दहाच्या आत आहे. ट्रामा केअर सेंटरची पूर्ण वास्तू केवळ कोरोना चाचणीसाठी वापरलीजात आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये दररोज फक्त 5 ते 15 असेच रुग्ण तपासणीसाठी येत असून या रुग्णांसाठी संपूर्ण ट्रामा केअर सेंटरची इमारत अडकवणे संयुक्तीक नाही. कोरोना चाचणी ग्रामीण रुग्णालयातही करता येणे शक्य आहे.

तर रुग्णांसह कैदी व आरोपींचाही मनस्ताप टळणार
डॉ.नितू पाटील यांच्या निवेदनावर, ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी केल्यास व ट्रामा केअर सेंटरमध्ये पूर्ववत नॉन कोविड सुविधा पुरवल्यास आजारी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांची गैरसोय टळणार आहे शिवाय त्यांना ट्रामा सेंटरमध्ये उपचार होणार असल्याने आर्थिक हृफटका सोसावा लागणार नाही तसेच आरोपींसह जेलमधील कैद्यांना जळगावच्या शिरसोली रोडवरील रुग्णालयात नेण्यासाठी होणार्‍या शासन खर्चात बचत होईल व पोलिसांवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. निवेदनाची दखल घ्यावी, अशी अपेक्षाही डॉ.नितू पाटील यांनी व्यक्त केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही पाठवण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !