केंद्राच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध 10 रोजी दुचाकी रॅली
कृषी विधेयक रद्द करण्यासह पीक विम्यातील निकम ‘जैसे थे’ ठेवण्याची अपेक्षा
बोदवड : केंद्राने अन्यायकारक कृषी विधेयक तसेच अन्यायकारक कामगार विधेयक रद्द करावे, केळी पीक विम्यातील निकष पूर्वीप्रमाणेच ठेवावेत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थींकडून आयकरच्या नावाखाली सुरु असलेली वसुली तत्काळ थांबवावी, प्रलंबित वन दाव्यांबाबत त्वरीत निर्णय घेवून वनदाव्यांचा दावेदारांना वनजमिनी ताब्यात द्याव्यात, खाजगी फायनान्स द्वारे सुरु असलेली जाचक वसुली तत्काळ बंद करावे, वीज कंपनीच्या अवाजवी बिलांमधील सक्तीची वसुली थांबावी यासह विविध न्याय मागण्यांसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून 10 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल दुचाकी रॅली नेण्याचा निर्धार करण्यात आला. बोदवड शहरातील शहरातील अग्रसेन भवनात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.
यांचा सेनेत प्रवेश
कार्यक्रमाच्या सुरुवातीला घाणखेड येथील माजी सरपंच श्रीकांत वाघोदे, निलेश करांडे, निलेश सरोदे, रीतेश वराडे, भूषण सरोदे, प्रमोद वराडे, विजय वराडे, ईश्वर पाटील, विनोद पाडर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
भ्रष्टाचार्यांना उघडे पाडणार
आमदार पाटील म्हणाले की. भ्रष्टाचार करून सामान्य माणसाला जो अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल त्याचा हिशोब चुकता करण्याची जबाबदारी माझी आहे. भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील 64 टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहे. त्यातून सर्वाधिक रोजगार निर्माण होता त्यामुळे केंद्र शासनाने लागू केलेला नवीन कृषी विधेयक हे शेतकर्यांना मोडकळीस आणणारे असल्याने त्यासह अन्य महत्वाचे विषय घेवून रावेर लोकसभेतील प्रत्येक तालुक्यातून हजारोंच्या संख्येत बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असून त्याकरीता शिवसेनेचे मंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते या मोर्चाप्रसंगी ऊपस्थित राहणार असल्याचे आमदार म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील, तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, संजय महाजन, अल्पसंख्यांक जिल्हा उपसंघटक कलिम शेख, दीपक माळी, शिक्षक सेनेच जी.व्ही.पाटील, संदीप तायडे यांच्यासमवेत कार्यकर्ते मोठ्या संख्येत ऊपस्थित होते.

