रेल्वेतील प्रशिक्षित व जागृत कर्मचार्‍यांमुळे गुन्हेगारीला आळा


अ‍ॅड.उज्ज्वल निकम : मध्य रेल्वेच्या सतर्कता जागृती सप्ताहाचा समारोप

भुसावळ : देशातील प्रत्येक नागरीकाने आजूबाजूच्या वातावरणाबाबत सतर्क आणि जागरूक राहण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. जर कर्मचार्‍यांना आपली कर्तव्ये पार पाडताना जागरुक राहण्याचे प्रशिक्षण दिले असेल आणि प्रशिक्षित केले तर रेल्वेमधील गुन्हेगारी देखील टाळता येतील. प्रवासी प्रवासातही जबाबदारीने वागून या प्रयत्नात सामील होऊ शकतात, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. मध्य रेल्वे सतर्कता जागृती सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महाव्यवस्थापकांच्या कॉन्फरन्स हॉल येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक बी.के.दादाभोय होते. अ‍ॅड.निकम यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात रेल्वे अधिकार्‍यांशी संवाद साधला. विभाग प्रमुख, सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेचे अन्य वरीष्ठ अधिकारी वेब लिंकद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
वरीष्ठ उपमहाव्यवस्थापक एस.के.पंकज यांनी प्रमुख पाहुण्यांचा परीचय दिला. सतर्कता जागृती सप्ताहाचा एक भाग म्हणून ऑनलाईन सेमिनार, क्विज स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, हिंदी निबंध स्पर्धा, वादविवाद व कर्मचारी तक्रार निवारण शिबिर तसेच सतर्कता अधिकारी व निरीक्षक यांचे ऑनलाइन आंतर-सक्रिय सत्र असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !