ओटीपी क्रमांक विचारत खात्यातून तीन लाख लांबवले
भुसावळातील बँक खातेदाराची फसवणूक : शहर पोलिसात गुन्हा
भुसावळ : खाते अपडेट करावयाचे असल्याचे सांगून मोबाईलवर पाठवलेला ओटीपी क्रमांक सांगा म्हणून भुसावळातील खातेदाराची तीन लाख 21 हजारात फसवणूक करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
शहरातील इंद्रायणी कॉलनीतील रहिवासी दिवाकर कान्हेकर यांना सोमवारी सायंकाळी अज्ञात संशयीताचा फोन आला होता. फोनवर संशयिताने आम्ही बॅँकेतून बोलत आहोत. तुमचा बँकेचा खाते क्रमांक सांगा, तुमचे खाते अपडेट करायचे आहे, असे सांगत ओटीपी क्रमांक विचारला. कान्हेकर यांनी ओटीपी क्रमांक दिल्याने त्यांच्या खात्यातून भामट्याने तीन लाख 21 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर कान्हेकर यांनी शहर पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. त्यामुळे आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आठवड्यात स्टेट बॅँकेचे खातेदार असलेल्या एका निवृत्त कर्मचार्याच्या बँक खात्यातूनही दोन लाख 16 हजार रूपये ऑनलाइॅन काढून फसवणुकीची घटना घडली होती.

