भुसावळात वेळेचे उल्लंघण : 14 विक्रेत्यांवर गुन्हे
नूतन पोलिस उपअधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे भुसावळात व्यावसायीकांचे दणाणले धाबे
भुसावळ : दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत दुकाने सुरू ठेवणे भुसावळातील व्यावसायीकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. शहर हद्दीत दोन तर बाजारपेठ हद्दीत दहा व तालुका पोलिसांच्या हद्दीत दहा विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईने विक्रेत्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या विक्रेत्यांना आता न्यायालयात पाठवण्यात येणार असून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येणार आहे. नूतन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील गुन्हेगारी थोपवण्यासह शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कंबर कसली असून सुज्ञ भुसावळकरांनी त्यांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
145 दुकानदारांविरूध्द गुन्हा दाखल
बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात जामनेर रोडवरील चायनीज विक्रेता प्रशांत नथ्थू पाटील, जामनेर रोडवरील चायनीज विक्रेता गणेश अशोक कोळी, दत्त नगरातील वांजोळा रोडवरील चाट भंडारचे संग्रामसिग राजपूत, दिनदयाल नगरजवळील पानटपरीचालक शुभम गोकूळ ठाकूर, बिर्याणी विक्रेता भारती शिंदे, जामनेर रोडवरील बिर्याणी विक्रेता राजेंद्र इंगळे, सिंधी कॉलनीतील हॉटेल व्यावसायीक नानक परशुराम परचानी, खडका रोडवरील चायनीज विक्रेता अकलाख मोहंमद नूर पिंजारी, ग्रीन पार्कमधील दुध डेअरीचालक ईस्माईल अ.रज्जाक तेली तर अयान कॉलनीतील दुध डेअरी चालक इरफान शेख रसीद यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हवालदार जयराम खोडपे, समाधान पाटील यांनी केली. दरम्यान, शहर हद्दीत दोन तर तालुका पोलिस ठाणे हद्दीत दोन दुकानदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हेगारीला बसणार आळा
शहरात वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले दुकाने, हॉटेल्स व ढाब्यांमुळे गुन्हेगारांना आयतेच रान मोकळे मिळते त्यामुळे सुरूवातीला शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच व्यापार्यांनी दुकाने बंद करावीत यासाठी पोलिस प्रशासनाकडून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवाय पोलिसांकडून
कारवाईची मोहिम अशीच सुरू राहणार आहे. भुसावळ शहरातील विविध भागाची स्वतः नूतन उपअधीक्षकांनी साध्या वेशात दुचाकीवर जावून पाहणी केली आहे त्यामुळे नेमक्या काय-काय उपाययोजना कराव्यात याबाबत त्यांच्याकडून आता हळूहळू अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.

