रावेर तालुक्यात ऑनलाईन ज्वारी खरेदीस सुरूवात
खरेदी-विक्री संघाबाहेर मध्यरात्रीपासून शेतकर्यांच्या लागल्या रांगा
रावेर : रावेर तालुक्यात शासकीय दरात ज्वारी मक्याची ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. रावेर तालुक्यातील शेतकर्यांनी ऑनलाईन नंबर लावण्यासाठी खरेदी-विक्री संघाबाहेर मध्यरात्रीपासून लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे धान्य खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भरड धान्य खरेदी केंद्र सुरू
रावेर तालुक्यात खरीप हंगामाचे ज्वारी व मक्याचे उत्पादन तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाले आहे. खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी शेतकर्यांमधून होती. यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीदेखील पाठपुरावा केला होता. अखेर खरीप हंगामाला केंद्र शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरड धान्य खरेदी केंद्र 3 नोहेंबर मंगळवार पासून सुरू झाले आहे.
शासनाचे असे आहे भाव
खरेदी विक्री संघामार्फत खरेदी केली जाणार्या ज्वारीला दोन हजार 620 तर मक्याला एक हजार 850 रुपये भाव निश्चित केला आहे. सर्व शेतर्यांनी कोरोना व्हायरस प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स ठेवून ऑनलाईन नोंदणी करावी तसेच प्रत्येक शेतकर्याचे नाव नोंदले जाणार असल्याचे खरेदी विक्री संघाचे मॅनेजर विनोद चौधरी यांनी सांगितले.
शेतकर्यांसाठी ही कागदपत्रे महत्वाची
शेतकर्यांकडून खरेदी करण्यात येणार्या मका प्रतिक्विंटल प्रमाणे आहे. शेतकर्यांची नाव नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु खरीप हंगामाचा पीकपेरा नोंदविलेला 7/12 उतारा, तलाठी यांची स्वाक्षरी असलेला घेऊन संस्थेशी संपर्क करावा.शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते, असेही कळवण्यात आले आहे.

