वरणगाव पालिका कर्मचारी संपावर : पाण्यासाठी नागरीकांचे हाल
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपरीषेचे कर्मचारी पगाराअभावी संपावर उतरले असून मंगळवार, 3 रोजी पहिल्या दिवशी शंभर टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा कर्मचार्यांनी केला. कर्मचार्यांचे पगार वेळेवर होत नाही तसेच पगारामध्ये तफावत असल्याने संघटनेच्यावतीने 3 नोव्हेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आल्यानंतर मागण्यांबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने मंगळवारी कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, कर्मचारी संपाचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असून नागरीकांचे हाल होत आहेत.
मागण्यांकडे दुर्लक्ष
वरणगाव नगरपरीषदेतील कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचार्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. याबाबत माहिती दिल्यानंतर देखील चर्चा न झाल्याने पालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहे. विशेषतः पाणीपुरवठ्यावर संपामुळे मोठा परीणाम झाला आहे शिवाय ऐन दिवाळीच्या सणामध्ये पाणीटंचाईला नागरीकांना सामोरे जावे लागणार आहे तसेच स्वच्छता व दिवाबत्ती यावरदेखील परीणाम झाला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू होईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनंत गडे, मुक्तार खान, गणेश तळेले, जतीन सपकाळे, बाबूलाल भोई, योगेश भोई, राहुल तायडे, शंकर झोपे, अशोक चौधरी, प्रमोद बावणे, रामदास भोई, सुनील भुसांडे, निलेश झांबरे, राजेंद्र जुमळे, प्रल्हाद कोळी व पाणीपुरवठा, दिवाबत्ती, सफाई आदी विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेतह. या संपाला विविध पक्षाच्या पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

