सेवानिवृत्तांच्या 19 वर्षांच्या लढ्याला यश : 21 लाभार्थींना 24 लाखांच्या धनादेशाचे वाटप
सेवानिवृत्त कर्मचार्यांची दिवाळी होणार गोड : सर्वोच्च न्यायालयाने दावा केला मान्य
भुसावळ : भुसावळ नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्यांनी पेन्शन विक्री योजनेंतर्गत राज्य शासनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला होता व सुमारे 19 वर्षांपासून हा लढा सुरू होता. कर्मचार्यांचा दावा सर्वोच्च न्यायालयात मान्य करण्यात आल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचार्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. गेल्या दोन महिन्यात 21 कर्मचार्यांना 24 लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहेत. एकूण 197 कर्मचार्यांच्या यादीतील कर्मचार्यांना आता लाभ मिळणार आहे.
सत्ताधार्यांनी दाखवली सहकार्याची भूमिका
नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी यांचा पेन्शन विक्री योजनअंतर्गत प्रलंबित असलेला सेवानिवृत्त कर्मचार्यांचा दावा अखेर मार्गी लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या रक्कम मिळण्यासाठी हिरवी झेंडी दाखवली आहे. यासाठी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवकांनी पेन्शनर असोसिएशनच्या सदस्यांना न्याय मिळण्यासाठी सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवली होती.
पालिका सभागृहात धनादेशाचे वाटप
पेन्शनर्स असोसिएशनतर्फे 2001 पासून 197 कर्मचार्यांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली होती. यातील सुमारे 60 कर्मचारी हे मयत झाले असून सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये उपदान, रजा रोखीकरण रक्कम, पेन्शन फरक यातील रकमेचा लाभ देण्याचा आदेश दिला होता व यानंतररही पेन्शन विक्री योजनेचा विषय प्रलंबित होता मात्र आता तोही मार्गी लागला आहे. ऑक्टोबर महिन्यात पालिका प्रशासनातर्फे 12 लाभाार्थीना 13 लाख 53 हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले तर नोव्हेंबरच्या महिन्यात मंगळवार, 3 रोजी भुसावळ नगरपालिका सभाग्रहात नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पालिका शिक्षण सभापती नगरसेवक मुकेश पाटील, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, निक्की पत्रा, दिनेश नेमाडे, वसंत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नऊ कर्मचार्यांना 10 लाख 37 हजार रुपये रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचार्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

