कनिष्ठ प्राध्यापकांच्या समस्यांबाबत जुक्टो संघटनेची शिक्षण उपसंचालकांशी चर्चा
भुसावळ : कनिष्ठ प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटना (जुक्टो) व पदाधिकार्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे यांनी नवनियुक्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट समस्यांबाबत चर्चा केली तसेच उपासनी यांची त्यांनी स्वागत केले. प्रा.राणे नुकतेच नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात भेटीसाठी गेले होते.
समस्यांबाबत दखल घेण्याचे आश्वासन
उपसंचालक उपासनी यांच्याशी चर्चेदरम्यान शालार्थचे प्रस्ताव मार्गी लावणे, शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर वेतन श्रेणीच्या मान्यता देणे, त्यासोबत शिक्षण उपसंचालकांच्या अखत्यारीत येणार्या वैद्यकीय बिलांच्या पूर्ततेच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांना दूरध्वनीवरून संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड यांनी जिल्ह्यात येऊन सहविचार सभा घेण्याची विनंती केली. उपसंचालक उपासनी यांनी लवकरच सभा घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्यालयातील कनिष्ठ विभागाचे नवनियुक्त शिक्षण निरीक्षक दिनेश देवरे यांचेदेखील स्वागत करण्यात आले.

