वरणगाव नगरपरीषद कर्मचार्‍यांचा संप तूर्त मागे


एक महिन्यांच्या वेतनासह दोन महिन्यांचा भत्ता दिवाळीपूर्व अदाचे आश्‍वासन : मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संप : अनंत गडे

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपरीषदेचे कर्मचारी पगाराअभावी मंगळवार, 3 पासून बेमुदत संपावर उतले होते. कर्मचार्‍यांच्या संपामुळे शहरात अस्वच्छता पसरली तर पथदिवे व पाणीपुरवठ्यावरही परीणाम झाल्याने नागरीकांचे चांगलेच हाल झाले. आगामी सण-उत्सवाचे दिवस पाहता नागरीकांची गैरसोय टळण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने कर्मचार्‍यांशी सकारात्मक चर्चा केली. दिवाळीपूर्वी एका महिन्यांचे मूळ वेतन व दोन महिन्यांचा विशेष भत्ता अदा करण्याचे लेखी आश्‍वासन मुख्याधिकार्‍यांनी दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. दरम्यान, सण-उत्सवाचे दिवस असल्याने नागरीकांची गैरसोय टळण्यासाठी आम्ही संप तूर्त मागे घेत असून आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा संप छेडू, असे वरणगाव नगरपरीषद मजदूर संघ अध्यक्ष अनंत गडे म्हणाले.

आश्‍वासनांबाबत दिले लेखी पत्र
संपकर्त्या कर्मचार्‍यांशी यावेळी चर्चा करण्यात आली तसेच वरणगाव नगरपरीषद मजदूर संघ अध्यक्ष अनंत गडे यांना मुख्याधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र यावेळी देण्यात आले. त्यात एका महिन्यांच्या मूळ वेतनासह दोन महिन्यांचा विशेष भत्ता अदा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे शिवाय वसुली चांगल्या प्रमाणावर झाल्यास आणखी एका महिन्यांचा विशेष भत्ता देण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. यावेळी प्रशासन अधिकारी दीपक सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शेख अखलाख, दीपक मराठे, सुधाकर जावळे, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !