भुसावळात वाहतुकीचे नियम मोडल्यास धडक कारवाई


रीक्षा चालकांना पोलिस उपअधीक्षकांचा अल्टीमेटम : 15 नोव्हेंबरपासून धडक कारवाई

भुसावळ : भुसावळात वाहतुकीचे नियम मोडलेले यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही व यापुढे 15 नोव्हेंबरपासून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त रीक्षा चालकांविरूद्ध पोलिसांकडून धडक मोहिम राबवून कारवाई केली जाईल, असा इशारा नूतन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथे दिला. शहर पोलिस ठाण्यात आयोजित रीक्षा चालकांसह रीक्षा युनियन पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. रीक्षा चालकाने वाहन चालवताना गणवेश, बिल्ला, परवाना बाळगावा अन्यथा कायदेशीर कारवाई होईल, असे वाघचौरे यांनी बजावले.

भर रस्त्यात रीक्षा थांबवणे खपवून घेणार नाही
वाघचौरे म्हणाले की, रीक्षा चालक प्रवासी बसवण्यासाठी रस्त्यात कुठेही रीक्षा थांबवतात त्यामुळे वाहतूक ठप्प होते त्यामुळे असे प्रकार आता यापुढे खपवून घेणार नाही. 15 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रीक्षा चालकांने रीक्षा चालवितांना त्यांच्या अंगात खाकी शर्ट घालावा तसेच बिल्ला, रीक्षा चालविण्याचा परवाना, गाडीची कागदपत्रे सोबत बाळगावी व नियमांचे पालन केले नाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशाराही त्यांनी दिला. प्रास्ताविकात बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी बसस्थानकाजवळील अस्ताव्यस्त लागत असलेल्या रीक्षा तसेच पांडुरंग टॉकीजजवळ उभ्या राहात असलेल्या रीक्षा अत्यंत बेशिस्तपणे लावल्या जात असल्याचे सांगत यापुढे हे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले.

नवीन थांब्यांसाठी सर्व्हे होणार
शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटविण्यासाठी पालिका आणि पोलिसांतर्फे संयुक्त मोहिम राबवून शहरात रीरक्षांसाठी नवीन रिक्षा थांबे ठरविले जाणार आहेत. या बैठकीला शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप भागवत, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व अभियंता उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !