कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही बरा…!


माजी मंत्री एकनाथराव खडसे : कुर्‍हा काकोडा परीसरातील जपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मुक्ताईनगर : राज्यात गेल्या काळात भाजपाची सत्ता होती तर जलसंपदा खाते गिरीश महाजन यांच्याकडे होत मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या भागातील कुर्‍हा वढोदा उपसा सिंचन, बोदवड उपसा सिंचन, मुक्ताई उपसा जलसिंचन या योजनांचे काम रखडले, असा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी करीत विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे पक्षाविषयी काय योगदान ? मी आमदार-खासदार नसलो तरी माझ्यात काम करण्याची धमक आहे. कारण पक्ष प्रवेशाच्या वेळी शरद पवारांकडुन मी शब्द घेतला आहे. अपूर्ण राहिलेल्या योजना पुर्ण करण्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील डोलारखेडा, नांदवेल, चिंचखेडा बु.॥, वायला, महालखेडा, टाकळी, वडगाव, निमखेडी बु.॥, बोदवड, इच्छापूर, चारठाणा या गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. प्रत्येक गावातील शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
खडसे म्हणाले की, मी स्पर्धक असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंगसारखा गुन्हा दाखल करण्याचे नीच राजकारण करण्यात आले. ज्या पक्षाला मी लहानाचे मोठे केले तो पक्ष सोडावा वाटत नव्हता मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असे देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता त्यांनी टोला हाणला. मी पक्ष सोडला नाही, मला सोडायला भाग पाडले, असे एकनाथराव खडसे म्हणाले. तालुक्यातील कुर्‍हा परीसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ उपस्थित होते.



अनेकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
शुक्रवारी संध्याकाळी कुर्‍हाकाकोडा येथे कमलसेठ गोयंका यांच्या घरासमोर कुर्‍हा काकोडा येथील आणि परीसरातील काही गावातील पक्ष पदाधिकारी यांच्या प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कुर्‍हा येथे एकनाथराव खडसे यांचे आगमन होताच फटाके, बँड पथकाद्वारे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष अवधुत भुते, माजी सरपंच ओमप्रकाश चौधरी, रणजीत गोयंका, भागवत सेठ राठोड, राजकुमार खंडेलवाल, रमेशसेठ खंडेलवाल, माणिक पाटील, मयूर साठे, माणिक पाटील, सुशील भुते, शंकर मोरे यांच्यासह 300 कार्यकर्ते आणि सुळे, पारंबी, हलगोटा,लालगोटा येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष लता सावकारे, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजु माळी, जि.प.चे माजी सदस्य सुभाष पाटील, हभप विशाल महाराज खोले, रामभाऊ पाटील, रवींद्र दांडगे, राजेश ढोले, शेषराव पाटील, कल्याण पाटील, सुभाष टोके, सुनील काटे, शिवराज पाटील, मुन्ना बोडे, दोमोदरे, सुभाष खाटीक, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते. कुर्‍हा येथे अ‍ॅड.रोहिणी खडसे व अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !