‘वंचित’च्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प


वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनासमोर प्राधिकरण झुकले : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

भुसावळ : कपिलवास्तू नगरात सर्व्हिस रोड व भुयारी मार्ग तयार करण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी संघटनेसह स्थानिक नागरीकांनी सोमवारी सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन छेडले तर दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनामुळे तब्बल पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी आंदोलकांसोबत जमिनीवर बसून लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगरजवळील कपिल वास्तू नगरसमोर सर्व्हिस रोड व भुयारी मार्गासाठी वंचित बहुजन आघाडीने दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी वंचित आघाडीचे जिल्हा युवा अध्यक्ष बाळा पवार, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, प्रदेश युवा सदस्या शमीभा पाटील, जिल्हा महासचिव दिनेश इखारे आदींच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलनाला सुरवात झाली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकार्‍यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भुमिका आंदोलकांनी घेतली. दुपारी महामार्ग महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी आंदोलकांची भेट घेतली व सिन्हा यांनी येत्या आठ दिवसांत सर्व्हिस रोड व भुयारी मार्गाचा प्रस्ताव दिल्लीला पाठवून मंजूरी मिळवू यानंतर मोजमाप व आराखडे तयार करुन कामाला प्रारंभ केला जाईल, असे आश्वासन दिल्याने दुपारी अडीच ते पावणेदिन वाजेदरम्यान आंदोलन मागे घेण्यात आले.

महामार्ग ठप्प : वाहनधारकांचे हाल
सकाळी 11 वाजेपासून सुरू असलेले आंदोलन दुपारी दोन वाजेपर्यंत चालल्याने तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांग लागल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेद्र पिंगळे, वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे आदींनी पोलिस बंदोबस्त ठेवला. प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रुपेश साळूंके, वंदना सोनवणे, बेबो किन्नर, विद्यासागर खरात, राहूल गवई, पल्ला घारु, पवन कांबळे, कपिल नगर भागातील नागरीक उपस्थित होते. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक नाहाटा महाविद्यालयापासून कुर्‍हा, मोढाळे, भानखेडा मार्गे बोदवड तर वरणगावकडून भागखेडा कुर्‍हा मार्गे नशिराबाद व भुसावळ शहर अशी वळविण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !