रावेरचे सीसीआय केंद्र दिवाळीआधी सुरू करा
रावेर राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलने दिले नायब तहसीलदारांना निवेदन
रावेर : गेल्या दीड महिन्यांपासून तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांच्या शेतातील कापूस निघणे सुरू असून अनेक शेतकर्यांच्या घरात कापूस वाढीव बाजार भाव मिळावा यासाठी रावेर येथील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीसीआय (भारतीय कापूस निगम ली.) दिवाळीआधी सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेल रावेरच्या वतीने माजी आमदार अरुण पाटील यांच्या उपस्थितीत ओबीसी सेल तर्फे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी नायब तहसीलदार सी.जी.पवार यांना निवेदन दिले.
उशिराने केंद्र सुरू झाल्यास शेतकर्यांना होणार नाही फायदा
निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्यांच्या घरात आलेल्या कापसाला खाजगी व्यापारी कमी भावात खरेदी करतात आणि दिवाळीच्या सणा सुदीत पैशांच्या अडचणीमुळे शेतकर्यांना कमी भावात कापूस द्यावा लागतो. अशा वेळी आपल्या तालुक्यातील सीसीआयची बंद असलेली कापसाची खरेदी सुरू झाल्यास किमान शेतकर्यांना वाढीव भाव मिळेल व आहे त्या कापसाचे वाढीव पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे. दिवाळीत शेतकर्यांचा कापूस विकला गेल्यावर सीसीआय सुरू झाल्यास त्याचा फायदा शेतकर्यांना होणार नाही, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ पाटील, प्रदेश सेवा दलाचे सदस्य प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन, युवक जिल्हा महिला अध्यक्ष माया बारी, कार्याध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष शेख मेहमूद, युवकचे शहराध्यक्ष प्रणित महाजन, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, हृदयेश पाटील, लक्ष्मण मोपारी, चेतन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

