चुंचाळेकरांची पहाट होते रामकृष्ण हरीच्या गजराने
यावल : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुकनाथ बाबांची पावन भूमी चुंचाळे येथे सालाबादा प्रमाणे श्री समर्थ वासुदेव बाबा वारकरी मंडळ व भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांतर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसर्या दिवसापासून कार्तिक दिंडीला मोठ्या उत्साहाने सुरुवात केली जाते. यावर्षीही कार्तिक दिंडीला प्रारंभ झाला. दिंडी सकाळी साडेचार वाजता सुकनाथ बाबा मंदिरावरुन आरती करून निघून संपुर्ण गावातून हरीनामाचा गजर गात सुकनाथ बाबा मंदिरात परतली व काकडा आरती करुन दिंडी सोहळ्याची सांगता होते. दिंडी एक महिना चालत असते. महिला सकाळी पहाटेच्यावेळी घरासमोर सडा रांगोळी तसेच जागोजागी तुळशी वृंदावन ठेवून दिवे लावून पूजा करून दिंडीचे स्वागत करतात त्यामुळे संपूर्ण चुंचाळे परीसरात चैतन्यमय वातावरण निर्माण होते. यावेळी दिंडीत ह.भ.प.प्रल्हाद पाटील, अरुण कोळी, मनोहर कोळी, किरण तेली, संजय चौधरी, प्रमोद तेली, प्रशांत राजपूत यासह लहान बालक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

