दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा
भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. दात्यांकडून वाटी-वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नवीन कपडे आणि शालेय साहित्य गोळा करायचे. गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्याठिकाणी दिवाळी साजरी करायचे, असा हा उपक्रम आहे. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.
2016 मध्ये रोवली मुहूर्तमेढ
समाजाचे आपण काही देण लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने सन 2016 मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, दुसर्या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे, तिसर्या वर्षी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण, विटवा या वस्तीवर तर चवथ्या वर्षी वड्री धरणाजवळील आसराबारी या आदिवासी वस्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरवासीयांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे. ज्यांना शक्य नसेल पण देण्याचे सुख अनुभवायच असेल त्यांनी जुने कपडे स्वच्छ धुवुन व इस्त्री करून द्यावे. फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे, समन्वयक जीवन सपकाळे, सह समन्वयक हरीश भट यांनी केले आहे.
उपक्रम यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर ,प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, जीवन महाजन, समाधान जाधव, सुनील वानखेडे, शैलेंद्र महाजन, श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, संदीप रायभोळे, देव सरकटे, भूषण झोपे, अमित चौधरी, प्रमोद पाटील, सचिन पाटील, राजू वारके, विक्रांत चौधरी, तेजेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परीश्रम घेत आहेत.
जुने नवे कपडे गोळा करणार
गतवर्षी या उपक्रमात फराळासह जुने व नवे कपडे गोळा करून जवळपास 400 व्यक्तींना वाटप करण्यात आले. यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लँकेट असतील ते देण्यासाठी प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे द्यावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे यांनी केले आहे.

