भुसावळातील चौघे पोलिस कर्मचारी मुख्यालयी जमा
हॉटेल व्यावसायीकाशी सलगी असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई
भुसावळ : भुसावळातील शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या चौघा कर्मचार्यांना मुख्यालयी जमा करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी सायंकाळी काढल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहर पोलिस ठाण्याचे बंटी सैंदाणे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नरेंद्र चौधरी, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण अशी या कर्मचार्यांचे नावे आहेत.
हॉटेल व्यवसायीकाशी सलगी नडली
राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर लॉकडाऊनच्या काळात दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी छापा टाकून सुमारे दोन लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. त्यावेळी हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या हॉटेल चालकाशी चार पोलिस कर्मचार्यांचा संपर्क असल्याच्या तक्रारी तत्कालीन पोलिस अधीक्षकांकडे काहींनी त्यावेळी केल्यानंतर राठोड यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. राठोड दिलेल्या गोपनीय अहवालानुसार पोलिस अधीक्षक डॉ.मुंडे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यातील तीन व शहर पोलिस ठाण्यातील एक अशा चार जणांचे मुख्यालय बदलीचे आदेश गुरूवारी काढले. त्यात नरेंद्र चौधरी, नीलेश बाविस्कर, सुनील सैंदाणे व प्रशांत चव्हाण या चार पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे.

