भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारींचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने पालकमंत्र्यांकडून सन्मान


कोरोना महामारीच्या काळात केलेल्या प्रशंसनीय कार्याची प्रशासनाकडून दखल : कोठारींनी रोवला भुसावळकरांच्या हृदयात सन्मानाचा तुरा

भुसावळ : भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक पिंटू कोठारी यांनी कोरोनाच्या कठीण काळात जनसेवेसाठी घेतलेल्या अहोरात्र परीश्रमाची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे जळगावच्या कांताई सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या स्वरूपात भुसावळातून केवळ एकमेव कोठारींचा झालेला गौरव हा भुसावळकरांसाठी निश्‍चित अभिमानास्पद बाब आहे, असे म्हणणे चुकीचे ठरू नये.

कोठारींच्या प्रशंसनीय कार्याबद्दल पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
नगरसेवक कोठारी यांनी मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर शहरासह प्रभागातील गरजू व्यक्तींना अन्न-धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले शिवाय गावाकडे पायीच निघालेल्या परप्रांतीयांसाठी जेवणाची व्यवस्था केली शिवाय पायाला भिंगरी लावून त्यांनी परप्रांतीय घरी पोहोचण्यासाठी पदरमोड करीत शक्य तितक्या अंतरापर्यंत वाहनांची व्यवस्था करून दिली तसेच भुसावळातील नागरीकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवल्यानंतर तब्बल एक हजार 250 रुग्णांना होम कॉरंटाईन केले, रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था केली. कोरोनात निधन झालेल्या रुग्णाजवळ रक्तातील नातेवाईक सरसावत नसताना कोठारी यांनी माणुसकीचा ओलावा जपत स्वतः कोरोनात मृत झालेल्या रुग्णांवर जीवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केले शिवाय कोरोनामुळे आई-वडील बाधीत झाल्यानंतर उपचारार्थ ते रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या दोघा चिमुकल्यांचे पालकत्वही स्वीकारत त्यांनी आपल्या घरी नेत त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करीत माणुसकी जीवंत असल्याचा प्रत्यय दिला. शववाहिनीच्या माध्यमातून लॉकडाऊनपासून तब्बल एक हजार पाचशे मृतदेह स्मशानभूमीत रुपयाही न घेता अंत्यसंस्कारासाठी आणण्यास हातभार लावला शिवाय ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन मीटर पुरवणे, नगरपालिकेला थर्मोमीटर व कोरोनाबाधीतांना आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करून एक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा? याचा प्रत्ययही आणून दिला.

योग्य व्यक्तीचा सन्मान : पालकमंत्री
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या कार्याचा गौरव करीत कोरोनाच्या कठीण काळात कोठारी हे कार्यकर्त्यांसह दोन-दोन हजार लोकांना अन्नदान करीत होते, या गोष्टीचा मी साक्षीदार असून योग्य व्यक्तीचा हा सन्मान असल्याचे ते म्हणाले.

वाढदिवसानिमित्त केला सत्कार
नगरसेवक कोठारी यांचा शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा कार्यक्रमानंतर त्यांचा सत्कार करीत सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक मनोज बियाणी, अ‍ॅड.निर्मल दायमा यांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !