किसान रेल्वेच्या माध्यमातून 12 हजार 400 टन माल वाहतूक


भुसावळ : लॉकडाऊन व अनलॉक कालावधी दरम्यान रेल्वेने प्राधान्याने वाहतुकीची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू व मालाच्या वाहतुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच फळ आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी किसान रेलची सुरूवात करुन शेतक-यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून 7 नोव्हेंबरपर्यंत 12 हजार 400 टन माल वाहतूक केली. डाळिंब, कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फात ठेवलेले मासे आणि इतर पार्सल या सारख्या नाशवंत वस्तूंची किसान रेल मधून वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेतून देवळाली ते मुझफ्फरपूर (त्रि-साप्ताहिक), नागपूर ते आदर्श नगर दिल्ली (साप्ताहिक) आणि सांगोला ते मनमाड (त्रि-साप्ताहिक) आणि सांगोला ते सिकंदराबाद (साप्ताहिक) किसान रेल गाड्या सुरू आहेत.

49 हजार 202 टन पार्सल गाड्यांद्वारे वाहतूक
मध्य रेल्वेने 75 हजार 282 टन जीवनावश्यक वस्तू जसे की, औषध आणि फार्मा उत्पादने, ई-कॉमर्स वस्तू, टपाल आणि इतर हार्ड पार्सल 597 वेळापत्रकीय पार्सल गाड्यांद्वारे आणि 49 हजार 202 टन पार्सल विशेष गाड्याद्वारे वाहतूक केली. गेल्या सात महिन्यात 9 नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेने सुमारे 13 हजार 400 मालवाहतूक गाड्या चालवल्या आहेत आणि दररोज सरासरी दोन हजार 776 वॅगनप्रमाणे एकूण 6.44 लाख वॅगन्समधून विविध वस्तूंची वाहतूक केली. मध्य रेल्वेने 2.50 लाख वॅगन्समधून कोळसा, 1.95 लाख वॅगन्समधून कंटेनर्स, 42 हजार 985 वॅगन्समधून सिमेंट, पाच हजार 127 वॅगन्समधून अन्नधान्य, 30 हजार 222 वॅगन्समधून खते, 60 हजार 541 वॅगन्समधून पेट्रोल, तेल व वंगण, 16 हजार 973 वॅगन्समधून पोलाद, तीन हजार 303 वॅगन्समधून साखर, सात हजार 805 वॅगन्समधून कांदा, दोन हजार 327 वॅगन्समधून कडबा तर संकीर्ण मालाची 28 हजार 727 वॅगन्समधून वाहतूक केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !