रावेर तहसीलला अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त
शासनाकडून शेतकर्यांना दिवाळीत मोठा दिलासा
रावेर : रावेर तालुक्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात हेक्टरी 10 हजार तर बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी 25 हजार रूपये नुकसान भरपाईचे सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पुरवठा अधिकारी हर्षल पाटील गेल्या तीन दिवसांपासून हे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी काम करीत आहे.
रावेर तालुक्यासाठी एक कोटी 13 लाख निधी प्राप्त
रावेर तालुक्याला 1 कोटी 13 लाख 32 हजार 588 रुपयांचा निधी तहसील कार्यालयात प्राप्त झाला आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे 10 व 16 जून, 12 व 23 ऑगस्ट, 19 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या 33 टक्के नुकसानीचे पंचनामे झालेल्या पात्र शेतकर्यांना प्रती हेक्टरी 10 हजार रुपये तर बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाईचे सानुग्रह अनुदान कमाल दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मंजूर करण्यात आले आहे. संबंधित पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.

