भुसावळातील बसस्थानक कात टाकणार कधी ?
एस.टी.प्रशासनाच्या बेफिकिरीने प्रवाशांना मनस्ताप : बसस्थानक आवाराचे अनेक वर्षांपासून डांबरीकरण रखडले
भुसावळ : जंक्शन स्थानकाला लागून असलेल्या व हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या भुसावळ बसस्थानक आवाराचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण रखडले आहे शिवाय बसस्थानकात सोयी-सुविधांचा अभाव असल्यानेही प्रवाशांनी बसस्थानकाकडे पाठ फिरवल्याने एस.टी.चे चाक तोट्यात रूतले आहे. कोरोना काळात बससेवा ठप्प झाल्यानंतर अलिकडच्या काही दिवसात ती पूर्ववत झाली असलीतरी ग्रामीण भागात अद्यापही बसफेर्या बंद आहेत मात्र दिवाळी कॅश करण्यासाठी लांब पल्ल्यासह मोक्याच्या शहरांसाठी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बसस्थानकात बस शिरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट उडत असल्याने प्रवाशांसह चालकांना मोठा मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
बसस्थानकाचे स्थलांतर होणार कधी ?
मुळातच शहराचे रस्ते अरूंद असून दिवसागणिक रस्त्यांवर येणार्या वाहनांची संख्या वाढणारे अतिक्रमण पाहता शहरात वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी आजची डोकेदुखी आहेत. त्यातच रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बसस्थानकाबाहेर अवैधरीत्या वाहतूक करणार्या वाहनांची संख्यादेखील मोठी आहे त्यामुळे बसेस बसस्थानकात प्रवेश करताना चालकाला मोठी कसरत करावी लागली नाही तर नवल !. भुसावळ बसस्थानकासाठी नाहाटा महाविद्यालयाजवळ नियोजित बसस्थानकाची जागा असून तिचे भूमिपूजनही पार पडले आहे मात्र अद्यापही बसस्थानकाचे स्थलांतर झालेले नाही.
बस स्थानकाचे स्थलांतर काळाची गरज
बसस्थानकाचे शहराबाहेर स्थलांतर झाल्यास बाहेर गावाहून येणार्या लांब पल्ल्याच्या गाड्या नाहाटा चौफुलीपासून पुढील प्रवासास रवाना होतील त्यामुळे शहरात होणारी वाहतुकीची कोंडी थांबेल शिवाय रीक्षा चालकांसह अन्य व्यावसायीकांना नाहाटा चौफुली ते रेल्वे स्थानकापर्यंत प्रवाशांची ने-आण करण्यासाठी रोजगाराचे साधनही उपलब्ध होवू शकते शिवाय मिनी सिटी बसच्या माध्यमातूनही आगाराला उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधी व एस.टी.प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.
बसेसच्या जागेवर दुचाकी
भुसावळ बसस्थानकात बसेस लावताना शिस्तीचा अभाव जाणवतो़ ज्या जागेवर बसेस उभ्या करावयाच्या त्या जागेवर नागरीक आपल्या दुचाकी लावताना दिसून येतात़ दिवसभर या दुचाकी या जागेवर उभ्या असल्याने बस चालक जागा मिळेल त्या बसेस उभ्या करतात त्यामुळे प्लॅटफार्म केवळ शोभेची वस्तू ठरले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बसस्थानकाची स्वच्छता करण्यात आलेली नाही शिवाय बसस्थानक आवारातही मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचा अभाव जाणवतो. विविध समस्यांनी घेरलेल्या बसस्थानकात अवैधरीत्या खाद्यपदार्थ विक्री करणार्यांची डोकेदुखी चिंतेची बाब आहे़
बसस्थानक आवारात डांबरीकरण गरजेचे
गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानक आवारात डांबरीकरण झाले नसल्याने बाहेरून बस आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट उडतात त्यामुळे श्वसनाचे आजारही होण्याची भीती आहे. बसस्थानकाचा अनेक भागात खड्डे पडल्याने आबालवृद्धांना चालताना मोठी कसरत करावी लागते. लोकप्रतिनिधी तसेच एस.टी.प्रशासनाने या संदर्भात दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
परीवहन विभागाकडे पाठपुरावा करणार : आमदार
परीवहन विभाग व रेल्वेचा जागा बदला संदर्भात वाद असल्याने बसस्थानकाचे शहराबाहेर स्थलांतर रखडले आहे. परीवहन विभागाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी नाहाटा चौफुलीजवळ नियोजित बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या बसेसला थांबण्यास मंजुरी दिल्यास आपल्या निधीतून आपण प्रवाशांसाठी शेड बांधून देवू, अशी ग्वाही आमदारांनी दिली.

