कर्जाच्या विवंचनेत सुनसगावच्या शेतकर्‍याची आत्महत्या


भुसावळ : कर्जाच्या विवंचनेत तालुक्यातील सुनसगाव येथील शेतकर्‍याने शेती शिवारात गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना घडली. समाधान उर्फ अण्णा पांडुरंग न्हाळदे (धनगर) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. सुनसगावच्या इंदिरा नगर वॉर्ड क्रमांक तीनमधील रहिवासी समाधान उर्फ अण्णा पांडुरंग न्हाळदे (धनगर) हे रविवारी सकाळी बटाईने केलेल्या सुनसगाव पिंपरी शिवार गट नंबर 14 व 15 मधील गलू सोपान पाटील (जळगाव) यांच्या शेतात गेले मात्र दुपार होवूनही घरी न परतल्याने लहान भाऊ शेतात पाहण्यासाठी गेला असता तेथे निंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले. यानंतर राहुल विठ्ठल काटे यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. घटनास्थळी भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहाय्यक निरीक्षक पवार तसेच कुर्‍हा औट पोस्टचे हवालदार युनूस शेख, विठ्ठल फुसे व कर्मचार्‍यांनी धाव घेत पंचनामा केला. भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कर्ज विवंचनेत केली आत्महत्या
यंदा हंगाम नाही तसेच ट्रॅक्टरचे हप्ते कसे भरावे तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जाची परतफेड कशी करावी ? या विवंचनेत आलेल्या नैराश्याने शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. रविवारी दुपारी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, वहिनी, बहिण, मुली, मुलगा, जावई असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !