यावलमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त
यावल : चोपडा-यावल मार्गावर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसुलच्या पथकाने विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर पकडल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 13 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास चोपडा-यावल मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी, कोतवाल निलेश गायकवाड यांच्या पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे डंपर (क्रमांक एमएच 19 सी.वाय.8686) या वाहनातुन वाळुची वाहतूक होत असताना अडवल्यानंतर संबंधित वाहनधारकाकडे वाळू वाहतुकीबाबत परवाना नसल्याने हे डंपर जप्त करण्यात आले. यावल शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी ट्रॅक्टरव्दारे मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरट्या मार्गाने विनापरवाना सर्रासपणे वाहतूकहोत असल्याने या प्रकारांना पायबंद घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

