डोंगरदे येथे सातपुडा पर्वतास 56 भोगांचा चढवला नैवेद्य
यावल : भगवान श्रीकृष्ण यांनी इंद्र देवतेपासून गोकुळाच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वतास शरण गेल्यानंतर गोवर्धन पर्वताने गोकुळाचे रक्षण केले होते. आपल्या धर्मात पर्वताना सुद्धा देवताच मानलेले असून आपणही गोकुळाप्रमाणे या आपल्या गोवर्धन रुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन या पर्वतावर वृक्ष संवर्धन, जलसंधारण आदी कामे करून शरण जावे व हाच सातपुडा गोवर्धनाप्रमाणेच आपले रक्षण करण्यास समर्थ असल्याचे आशीर्वचन गोवर्धन पूजेच्याप्रसंगी प.पू.महामंडलेशवर जनार्दन हरी महाराज यांनी तपस्थळी जागृत दत्त देवस्थान, डोंगरदे येथे आयोजित गोवर्धन पूजेप्रसंगी केले. यावेळी प.पू.स्वामी स्वरूपानंद महाराज, ह.भ.प. गुरव महाराज व भक्तगण उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यास सातपुडा सक्षम
ज्याप्रमाणे गोकुळात अतिवृष्टी व दुष्काळाच्या तीव्रतेमुळे गोकुळ वासीयांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी समस्त गोकुळ वासीयांना गोवर्धन पर्वतास शरण जाण्याचा उपदेश केला. मानवी जीवनावर येणार्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी पर्वतराज नेहमी सक्षम ठरल्याची शिकवण आपल्या संस्कृतीत आपल्याला मिळालेली असून त्याप्रमाणेच आज आपल्यावर येणार्या दुष्काळ, पाऊस न येणे आदी सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडायचे असेल तर आपल्या गोवर्धनरुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन येथे जलसंधारण, वृक्षारोपण आदी कामे केल्यास हाच सातपुडा आपल्या परीसरास सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यास सक्षम आहे तसेच पुढील वर्षांपासून या गोवर्धन पूजेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा संकल्प समस्त नागरीकांनी करावा, असे आवाहन महाराजांनी आशीर्वाचनात महाराजांनी केले. प्रसंगी प.पू.जनार्दन हरीजी महाराज व प.पू. स्वरूपानंद महाराज यांच्याहस्ते पर्वतराजाची आरती करून 56 भोग नैवेद्य अर्पण करण्यात आला.

