दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद
श्रीनगर : श्रीनगरच्या बाहेर असलेल्या परीम्पुराच्या खुशीपुरात दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केल्याने दोन जवान शहीद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सध्या सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्यानं चालू वर्षात आतापर्यंत 4 हजार 137 पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गेल्याच आठवड्यात भारतीय लष्करानं चार दहशतवाद्यांचा नगरोटामध्ये खात्मा केला. हे दहशतवादी एका ट्रकमधून लपून जात होते. याची माहिती मिळताच भारतीय लष्करानं धडक कारवाई करत चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. त्यामुळे त्यांनी घातपाताची मोठी योजना आखल्याचं स्पष्ट झालं.