जळगावात भंगार चोरी : आरोपीला अटक
जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परीसरातील भंगाराच्या दुकानातून 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करणार्या राजेश अशोक गवळी (24, रा. गेंदालाल मिल) या संशयीत आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहनाज गुलाब खान (39, रा.गेंदालाल मिल परिसर, जळगाव) यांचे गेंदालाल मिल परीसरातील महानगरपालिका कार्यालयाच्या बाजुलाच मुस्कान स्क्रॅप नावाचे भंगाराचे दुकान आहे. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दुकान बंद केले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 30 हजार रूपये किंमतीचे 3 क्विंटल वायरचे तुकडे, बारीक तांब्याची तार असलेले भंगार चोरून नेल्याचे 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयित आरोपी राजेश अशोक गवळी (24, रा.गेंदालाल मिल) यास अटक केली असून त्यांच्या ताब्यातील चोरलेले भंगार जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास नाईक दीपक सोनवणे करीत आहे.

