एक वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर फिर्यादीसह साक्षीदारांना केली मारहाण
भुसावळ : खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपीने जामिनावर सुटल्यानंतर फिर्यादीसह साक्षीदाराला धमकावल्याचा प्रकार शहरात घडला होता. या संदर्भात फिर्यादीने खंडपीठात धाव घेत आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केल्यानंतर ती मंजूर झाली मात्र आरोपी जामीन रद्द झाल्यानंतर पसार होण्यात यशस्वी झाला होता. तब्बल एक वर्ष नऊ दिवसानंतर बाजारपेठ पोलिसांना चकमा देणार्या राजेंद्र उर्फ गोलु उर्फ गणेश सुभाष सावकारे (23, रा.तुळजाभवानी मंदिर, न्यु एरीया वॉर्ड, भुसावळ) यास अटक करण्यात यश आले आहे.
खुनाच्या गुन्ह्यात झाली होती अटक
दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सव मिरवणुकीत 5 सप्टेंबर 2017 रोजी रात्री नऊ वाजता बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरच आरोपी गोलु सावकारेने ललित उर्फ विक्की हरी मराठे (22) याचा खून केला होता. आरोपी गोलूविरोधात त्यावेळी खुनाचा गुन्हा दाखल होवून त्यास अटक झाली तर 20 डिसेंबर 2017 रोजी आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. मात्र त्यानंतर आरोपीने 17 एप्रिल 2018 रोजी या गुन्ह्यातील फिर्यादीसह व साक्षीदारांना मारहाण व शिवीगाळ करू जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पुन्हा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होवून आरोपीस अटक झाली. त्यानंतर या गुन्ह्यात 21 एप्रिल 2018 रोजी आरोपीची जामिनावर सुटका झाली मात्र फिर्यादी व साक्षीदार यांनी औरंगाबाद खंडपीठात आरोपीचा जामीन रद्द होण्यासाठी याचिका दाखल केल्याने न्यायालयाने ती मान्य केली. 28 सप्टेंबर 2018 रोजी आरोपीचा जामीन रद्द होवून त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट निघाले मात्र आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.
एक वर्ष नऊ दिवसानंतर आरोपीला अटक
आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सावकारे हा शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गुरुकुलकडे आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या नेतृतवात पोलिस नाईक दीपक जाधव, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी आदींनी आरोपीला अटक केली. दरम्यान, शनिवारी आरोपीला भुसावळ न्यायालयात चंद्रकात बोदडे, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील आदींनी हजर केल्याने न्यायालयाने आरोपीची जळगाव कारागृहात रवानगी केली.