देशवासीयांना दिलासा : कोरोनावरील लस सर्वांना मोफत मिळणार
नवी दिल्ली : देशात कोरोनावरील लस ही मोफत दिली जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे. आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना कोरोनावरील लसीच्या शुल्काबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांनी केवळ दिल्लीच नाही तर देशातील सर्व नागरीकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असे सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे कोरोनावरील लसीकरणाबाबत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम मिळणार आहे. दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी व्यापक मोहीम केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी सरकारकडून करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील लोकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. या लसीकरणाची ड्राय रन आज देशभरात सुरू आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनावरील लसीकरणाची ड्राय रन सुरू आहे.