23 सायकलपटूंनी पूर्ण केले पाल सायकलिंग चॅलेंज
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजन : 50 व 100 किलोमीटर गटासाठी झाली स्पर्धा
भुसावळ : भुसावळ स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे ‘पाल अल्ट्रा हिल सायकलिंग चॅलेंज’ या 100 किलोमीटर व 50 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अवघड अशा या स्पर्धेत 23 सायकलपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. 50 किलोमीटरसाठी भुसावळ ते खिरोदा व पुन्हा परत भुसावळ असा मार्ग होता तर 100 किलोमीटरसाठी भुसावळ खिरोदा पाल व त्याचमार्गे परत भुसावळ असा मार्ग होता.
या अंतरासाठी झाली स्पर्धा
उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली. 50 किलोमीटरसाठी तीन तास 30 मिनिटे तर 100 किलोमीटरसाठी 8 तास 30 मिनिटांचा कमाल कालावधी ठरविण्यात आला होता. सर्व सायकलपटूंनी निर्धारीत वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली. सर्व यशस्वी सायकलपटूंना प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती संयोजक प्रवीण पाटील व ब्रिजेश लाहोटी यांनी दिली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पूनम कुलकर्णी या महिला सायकलपटूने 100 किमी गटात प्रतिनिधित्व करून ही स्पर्धा सहजपणे पूर्ण केली. त्यांच्याशिवाय सीमा पाटील व सोनाली पाटील यांनीदेखील 50 किलोमीटरमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला तसेच प्रशांत अत्रे यांनी 100 किलोमीटरचे अंतर सिंगल गिअरच्या सायकलने सहज पूर्ण केले. पालचा सातपुडा डोंगर पार करणे आव्हानात्मक होते परंतु भुसावळ रनर्सच्या सदस्यांनी ठिकठिकाणी केलेली पाणी व फळांची व्यवस्था तसेच त्यांनी केलेल्या कौतुकामुळे आम्ही ही स्पर्धा सहजपणे पूर्ण करू शकलो, असे अॅड.दिलीप जोनवाल व डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले. भुसावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रिया पाटील व हर्षल लोखंडे, खिरोदा येथे शेख रीजवान व श्रीकांत नगरनाईक तर पाल येथे अजय पाटील व राजेंद्र ठाकूर हे प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेची नोंद घेत होते. ही संपूर्ण स्पर्धा भुसावळ तालुक्यातील प्रथम बीआरएम विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेआधी पुनम भंगाळे यांनी वॉर्म अप घेतले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.नीलिमा नेहेते होत्या.

यांनी घेतले परीश्रम
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, रणजीत खरारे, स्वाती फालक, चारुलता अजय पाटील, प्रमोद शुक्ला, सरोज शुक्ला यांनी सहकार्य केले. या स्पर्धेत अथर्व शितोळे, भाऊसाहेब पाटील, चंद्रशेखर सोनवणे, चेतनकुमार शाह, दत्तू सपकाळे, जयश्री पाटील, कैलास छाबरा, नितीन साळुंके, नितीन रमानी, प्रकाश अटवाणी, सचिन मनवानी, सीमा पाटील, उमेश घुले, योगेश लुंकड, डॉ.महेश फिरके, डॉ.तुषार पाटील, प्रशांत अत्रे, पुनम कुलकर्णी, अॅड.दिलीप जोनवाल यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
