शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांमध्ये व्हीपीयु रॅकची विभागणी


खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना आले यश : शेतकर्‍यांमध्ये समाधान

सावदा : कोरोना काळात सुरू झालेल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून छोट्या शेतकर्‍यांना त्यांचे केळी फळपीक मेट्रो सिटीजमध्ये सहजतेने विकता यावे यासाठी पंतप्रधान किसान रेल्वेची मुहूर्तमेढ रचली गेली. याला शेतकर्‍यांकडून व व्यापार्‍यांकडून भरघोस प्रतिसादही मिळत आहे. मेट्रोसिटीजमध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी फळ पिकाला मागणी वाढून छोट्या शेतकर्‍यांना आर्थिक उत्पन्नातही हातभार लाभला. मेट्रो सिटीजमधली वाढती मागणी लक्षात घेऊन फळपीक बागायतदार यांनी वाढीव व्ही.पी.यु. रॅक मिळणेबाबत खासदार रक्षा खडसे यांना विनंती केली होती. शेतकर्‍यांची रास्त मागणी हेरून केंद्रातून खासदारांनी वाढीव व्ही.पी.यु.रॅक उपलब्ध करून दिले. व्यापारी व शेतकर्‍यांच्या आपसी मतभेदामुळे वाढीव रॅक भरण्याबाबत मत-मतांतरे निर्माण झाली. यात खासदारांनी मध्यस्ती करत शेतकरी व व्यापारी यांच्यातला ताळमेळ साधून शेतकर्‍यांच्या हितार्थ व्ही.पी.यु.रॅकची समसमान विभागणी केली.

शेतकर्‍यांना सोबत बाळगून साधावा उत्कर्ष
कष्टाळू शेतकर्‍यांच्या हितार्थ व्यापार्‍यांनी तडजोडीचे धोरण अंगीकारले पाहिजे. शेतकर्‍यांशिवाय व्यापार होऊ शकत नाही याची जाणीव व्यापार्‍यांनी ठेवणे आवश्यक असून शेतकर्‍यांना सोबत घेऊन उत्कर्ष साधला जाऊ शकतो. व्ही.पी.यु.रॅक नियोजनबद्ध व समसमान विभागून व्यापारासह आर्थिक प्रगती साधता येऊ शकते. त्यासाठी सामंजस्याचे धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. व्यापार्‍यांचेही आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकर्‍यांनी कृतिशीलता दाखविणे आवश्यक आहे. त्यासाठीच शुक्रवारी व्यापारी युनियन सावदा, किसान मंडळ सावदा आणि फळ बागायतदार शेतकरी मंडळ, रावेर यांची खासदार रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचा सकारात्मक परिमाण निघून प्रथम रॅक भरणा करण्याचे प्राधान्य किसान मंडळ, सावदा यांना मिळाले असून त्यांच्या पाठोपाठ फळबागायतदार शेतकरी व्यापारी युनियन सावदा यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर जीएस स्पेशल सहा कोच किसान मंडळ, सावदा तर अठरा कोच फळबागायतदार शेतकरी मंडळ, सावदा अशी विभागणी करण्यात आली आहे. रेल्वे व्यवस्थापनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत झालेल्या तडजोडीबाबत सूचित करण्यात आले आहे. केलेल्या नियोजनानुसार सुरळीत व्यवहार सुरू झाल्यास व्यापार्‍यांसाठी आणखी व्ही.पी.यु. रॅक वाढविण्याबाबत केंद्रातून मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार रक्षा खडसे यांनी व्यापार्‍यांना दिले. यावेळी मोठ्यासंख्येने फळपीक शेतकरी व्यापारी युनियनचे सदस्य व व्यापारी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !