भुसावळातील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची व्यवस्था करा
सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांची मागणी
भुसावळ : जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढत असून मृत्यूदर वाढतो आहे. वाढलेल्या मृत्यू दरामुळे कोरोना मृत रुग्णांवर अंत्य संस्कार करण्यासाठी भुसावळ येथील स्मशानभूमीत तापी नदीच्या किनारी असलेल्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची व्यवस्था, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशीर जावळे यांनी केली आहे. तसे झाल्यास वेळेची व लाकडांची बचत होईल. या माध्यमातून पर्यावरण रक्षण पण होईल. आणि मृतांवर अंत्यसंस्कार त्वरीत होतील. म्हणून भुसावळ येथील तापी नदी किनार्यावरील स्मशानभूमीमध्ये कधी होणारे अंतिम संस्कारासाठी लागणार्या वेळेला टाळण्यासाठी, विद्युत वाहिनीची व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित तथा भुसावळ मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
विद्युतदाहिनी झाल्यास मृतदेहाची थांबणार हेळसांड
भुसावळ येथील तापीनदी किनार्यावरील स्मशान भूमीमध्ये डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील कोरोना मृत रुग्णांना सुद्धा येथे अंतिम संस्कारसाठी आणत असल्यामुळे त्या ठिकाणी मृतदेहांची गर्दी होत आहे. भुसावळ स्मशान भूमीत कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात सरपण लाकडे, शेणाच्या गोवर्र्या, या साठी आवश्यक इतर साहित्य मोठ्या प्रमाणात लागत आहे. अंतिम संस्कारासाठी लाकडांची प्रचंड मागणी वाढत आहे. कोरोना मृत रुग्णांच्या मृतदेहावर अंतिम संस्कारासाठी सध्या लागत असलेली प्रतीक्षा टाळण्यासाठ, तसेच एकीकडे पर्यावरण रक्षण करण्यासाठी व लाकडांचा वापर थांबविण्यासाठी व त्वरित अंतिम संस्कार होउन मृतदेहाची हेळसांड थांबविण्यासाठी व वेळेची बचत होण्यासाठी, भुसावळ नगरपालिकेने मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केली आहे.



