भुसावळात रुग्णांचे प्राण धोक्यात आल्यानंतर स्वर्खातून केला ऑक्सीजनपुरवठा
डॉक्टरांच्या सहृदयी कार्याला सलाम ! : डॉ.नी.तू.पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक
भुसावळ : शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये 14 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत मात्र बुधवारी ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला तर पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सीजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली. अशा बिकट स्थिती भाजपचे डॉ.नी.तू.पाटील यांनी सात हजार रुपयांचा स्वखर्चातून 10 सिलेंडरचा पुरवठा करून दिला. यामुळे गुरुवारी रात्रीपर्यंत हा साठा टिकणार आहे तर सायंकाळी पुन्हा पुरवठादाराकडून पाच सिलिंडर उलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
ठेकेदाराचे बिल थकले
भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील करोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सीजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखीलदिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सीजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामीण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर उपलब्ध होते. यामुळे केवळ सायंकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सीजन देता येणार होता. यामुळे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत होते. भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक तथा अध्यक्ष, ऊँ.सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ डॉ. नी. तू. पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी हिंदूस्तान एजन्सीतून सात हजार रुपयांचे तुर्त दहा सिलेंडर खरेदी करून ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.



पुन्हा सिलिंडरची गरज
हा ऑक्सीजनचा साठा गुरुवारी सकाळी नऊ ते रात्री 10 वाजेपर्यंत टिकणार असल्याचे सांगण्यात आले यानंतर मात्र पुन्हा सिलेंडरची गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासकिय यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सर्व बिकट परीस्थिती पाहूनही ठोस निर्णय घेत नसल्याने 14 रग्णांचा जिव टांगणीला आहे. ऑक्सीजनचा पुरवठा होत नसेल तर उपचार होतील कसे? असा प्रश्नही निर्माण होत आहे.
50 वाढीव बेडचे नियोजन फोल
ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सीजनयुक्त सुविधेचे 50 बेडचे नियोजन आहे. यासाठी 15 क्युबीक मिटरचा ऑक्सीजन जनरेशन प्लॉटला आमदार संजय सावकारे यांनी 30 लाखांचा निधी दिला आहे मात्र सप्टेंबरपासूनचे हे नियोजन सात महिने उलटूनही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे मात्र ऑक्सीजनअभावी रुग्ण मरणाच्या दारात आहेत.
रस्त्यावर उतरावे लागेल
बुधवारचा दिवस व रात्र ऑक्सीजन सिलेंडरमुळे लोटली गेली, मात्र गुरुवारी पुन्हा पुरवठा लागणार आहे. यामुळे समाजातील दानशुरांनी मदत करुन किमान ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून रुग्णांचा जीजव वाचवावा. जिल्हा व आरोग्य प्रशासन सुस्तावले असून आता रस्त्यावर उतरावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे ऊँ.सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नि.तु.पाटील म्हणाले.
