भुसावळ, वरणगाव आयुध निर्माणीत कोरोनाचे निर्बंध
भुसावळ : कोरोनाच्या ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वरणगाव व भुसावळ आयुध निर्माणीचाही सहभाग राहणार आहे. केवळ आयुध निर्माणी वसाहतीत राहणार्या कर्मचार्यांना तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना कामावर जावे लागणार आहे. 15 ते 30 एप्रिल दरम्यानच्या काळासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने 13 एप्रिलच्या आदेशानुसार निर्बंध दिले आहेत. या पार्श्वभुमीवर आयुध निर्माणी भुसावळचे महाप्रबंधक वसंत निमजे व वरणगाव येथील महाप्रबंधक एस.के. राऊत यांनीही आयुध निर्माणीच्या कामकाजावर निर्बंधांचे आदेश बुधवारी काढले आहे. या आदेशानुसार 15 ते 30 एप्रिल दरम्यान केवळ आयुध निर्माणीच्या वसाहतीत राहणार्या कामगारांना कामावर यावे लागेल. तर उर्वरित बाहेर राहणार्या कामगारांना गरजेचनुसार सेक्शन प्रमुख बोलावेल त्यावेळी कामावर यावे लागेल. कर्मचार्यांची संख्या नियंत्रणात राहण्यासाठी हे निर्बंध आहेत. दरम्यान वरणगाव व भुसावळ आयुध निर्माणीतील दवाखाना, अग्निशमन केंद्र, विजपुरवठा, पाणीपुरवठा आदी आपत्कालीन विभाग सुरु असतील. वसाहतीच्या बाहेर किंवा शहरात राहणार्या कामगारांनाही सेक्शन प्रभारी ड्यूटीने ड्यूटी लावली तर कामावर हजर व्हावे लागेल, अशी माहिती ऑल इंडिया डिफेन्स एम्पॉईज फेडरेशनचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र झा यांनी दिली.



