शिरसाळा शेत शिवारातून पाण्याच्या मोटारसह केबल लंपास
बोदवड : तालुक्यातील शिरसाळा शेत शिवारातील एका शेतकर्याच्या शेतातील विहिरीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटार व केबल मिळून एकूण सात हजारांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबवले. 16 रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शेतकर्याच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बोदवड येथील रहिवासी सुभाष पंडितराव मराठे यांचे शिरसाळा शेत शिवारात गट नंबर 232/1/2 मध्ये शेत असून शेताच्या विहिरीत असलेली तीन हॉर्सपॉवरची तीन हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार तसेच 7 हजार रुपये कमतीची 70 फूट लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी दिनांक 12 ते दि. 16 एप्रिलच्या सकाळी दहा वाजेच्या दरम्यान चोरून नेली. शेतकरी सुभाष मराठे हे 16 रोजी शेतात गेले असता विहिरीतील पाण्याची मोटार व केबल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी बोदवड पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कालिचरण बिराडे करीत आहेत.



