जळगाव जिल्ह्यात डॉप्लर रडार बसवावी


प्रा.धीरज पाटील यांचा संबंधितांकडे पत्रव्यवहार, शेतकर्‍यांना फायदा

भुसावळ : पाऊस कधी सुरू होईल, तो कोठे आणि किती होईल याची माहिती प्रशासनाला मिळाल्यास आपत्कालीन अलर्ट देऊन जीवित आणि वित्तहानी टाळणे खात्रीने शक्य होईल. यासाठी डॉप्लर रडारची उभारणी फारच महत्त्वपूर्ण मानण्यात येते. केंद्र शासनाकडून पाच एक्स बँड डॉप्लर रडार महाराष्ट्रात बसवण्यात येणार आहेत. त्यातील एक रडार जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधीतांकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी दिली.

ढगफुटी व गारपीटीची अचूक माहिती मिळणार
एक्स बँड डॉप्लर’ ही विज्ञानाची अशी एक निर्मिती आहे, ज्याने काही तास अगोदरच आपल्याला ढगफुटी, गारपीट आदींची अचूक माहिती मिळते. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून उंचीवरील ठिकाणी बसविणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. ही डॉप्लर रडार बसविल्यास उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. यामुळे हवामानाची अचूक माहिती शेतकर्‍यांना मिळणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठीदेखील ते उपयुक्त ठरणार आहे.



यंत्रणेमुळे शेतकर्‍यांना फायदा
हवामानाचे, पावसाचे, अतिवृष्टीचे, गारपिटीचे अचूक अंदाज वर्तविण्यासाठी डॉप्लर रडार ही यंत्रणा उपयुक्त असते. या यंत्रणेच्या साहाय्याने आपत्कालीन स्थितीचा अचूक अंदाज आधीच घेता येतो. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमीत कमी करण्यासाठी आधीच प्रयत्न करता येतात. विज्ञानाने विकसित केलेली ही फार मोठी देण असून जगभर तिचा उपयोग केला जातो. बोटाच्या पेराएवढ्या लहान भागातदेखील किती बाष्प, बर्फ कण व पाणी आहे याची माहिती ही यंत्रणा देते. त्यामुळे किती मिलीमीटर पाऊस, कोणत्या ठिकाणी व किती वाजता पडेल हे बिनचूक सांगणे शक्य आहे. जळगांव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अचूक हवामान माहिती मिळाल्यास फायदा होणार असल्याने पाठपुरावा करीत आहे, असे प्रा.पाटील यांनी सांगितले. जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांनाही निवेदनाच्या प्रत पाठवण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !