खिर्डी परीसरात अवैध देशी-विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई
खिर्डी, ता.रावेर : खिर्डी, ऐनपूर व निंभोरा बुद्रुक परीसरात अवैध धंद्यांवर निंभोरा पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. ऐनपूर गावाचे हद्दीतील ऐनपूर ते खिर्डी रस्त्यावरील चिंच फाट्याच्याजवळ असलेल्या संकेत धाब्याच्या आडोशाला मधुकर प्रभाकर ठाकूर (30, खिर्डी बुद्रुक) यांच्या ताब्यातून सहा हजार 922 रुपये किंमतीची देशी-विदेशी कंपनीची दारू जप्त करण्यात आली. खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी-ऐनपुर रस्त्यावरील ब्रम्हा ढाब्याच्या आडोशाला ब्रम्हानंद छगन जयस्वाल (41, खिर्डी बुद्रुक) यांच्या ताब्यातून तीन हजार 330 रुपये किंमतीची विदेशी-दारू जप्त करण्यत आली. खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी ते ऐनपूर रस्त्यावरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुढे असणार्या भाऊ ढाब्याच्या आडोशाला चंद्रकांत जयराम कोळी (30, रा.जळगाव तालुका, जळगाव, हल्ली मुक्काम वाघाडी) यांच्याताब्यातून दोन हजार 665 रुपये किंमतीची विदेशी दारूची जप्त करण्यात आली. एकूण 12 हजार 970 रुपये किंमतीच्या बेकायदा दारू विक्रीप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. निंभोरा बुद्रुक गावातील भरत रमेश महाले (27) व निलेश संतोष कोळी (24) यांनी देखील त्यांच्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू अनुक्रमे 15 लिटर सहाशे रुपये किंमतीची व वीस लिटर आठशे रुपये किंमतीची दारु कब्जात बाळगल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहा.निरीखक स्वप्नील उन्नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, हवालदार राकेश वराडे, हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, हवालदार गणेश सूर्यवंशी, पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, पोलिस नाईक स्वप्नील पाटील व होमगार्ड योगेश फालक यांनी केली.



