शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज : खासदार संजय राऊत
जळगाव : शिवसेनेचा खासदार द्यावा, अशी सर्व शिवसैनिकांची भावना असून यापुढे कोणतीही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. शहरात शिवसेनेचा झालेल्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जळगावात सेनेचा मेळावा
जळगावात शनिवारी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज
खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या पक्ष बांधणीच्या संदर्भात आपण उत्तर महाराष्ट्राचा दौरात करीत आहोत. या अनुषंगाने शनिवारी जळगावात बैठक घेतली. यातून पक्षाला बळ देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाटचालीबाबत आवश्यक ते निर्णय घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई आणि कोकणानंतर जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अतिशय मजबूत असेच आहे. आजवर पक्षाने ग्रामपंचायत सदस्यांपासून ते आमदार आणि मंत्री दिले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, जळगाव महापालिकेतील सत्तांतराबाबत पालकमंत्री व संपर्क प्रमुख हे अंधारात नव्हते तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्च केल्यानंतरच जळगावात सत्तांतर झाल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. तर पक्षात जुन्या-नव्यांचा संघर्ष नसल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
