गाडगेबाबा अभियांत्रिकीचा ‘ब्लँका बोट्झ संघ’ दक्षिण कोरीया गाजवणार

भुसावळ : चीनसह रशिया तसेच भारतातातील सर्व प्रमुख आयआयटी मधील कॉम्बॅट रोबोटिक्सच्या स्पर्धा गाजवल्यानंतर भुसावळात श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ब्लँका बोट्झ हा रोबोटिक्स संघ आता दक्षिण कोरीयातील स्पर्धा गाजवायला सज्ज झाला आहे. ब्लँका बोट्झ संघाचा संस्थापक सदस्यांपैकी एक असलेला अनिकेत किनगे दक्षिण कोरीयाच्या मोहिमेवर निघण्यासाठी तयार झाला आहे. दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊल येथील राष्ट्रीय विज्ञान व तंत्रविज्ञान विद्यापीठ यजमानत्व भूषवत असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉम्बॅट रोबोटिक्स स्पर्धेमध्ये ब्लँका बोट्झ रोबोटिक्स संघाची निवड झाली. 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान या स्पर्धा होत आहे.
भारतातून एकमेव संघाचा सहभाग
ब्लँका बोट्झ या संघाचा कौतुक सोहळा महाविद्यालयात झाला. अनिकेत किनगेच्या नेतृत्वांतर्गत ब्लँका बोट्झ हा भारतातून कोरीया येथील आंतरराष्ट्रीय कॉम्बॅट रोबोटीक्स स्पर्धेमध्ये निवड झालेला आणि सहभागी होणारा एकमेव संघ ठरला आहे. प्राचार्य डॉ.आर.पी. सिंग यांच्या हस्ते स्पर्धेचे आमंत्रण पत्र वितरण करण्यात आले. अक्षय जोशी, शुभम दुसाने, अनिकेत किनगे, विनय चौधरी, शुभम नेमाडे, रोहित वारके, सिमरन भोळे, प्रेमकुमार पाटील, वीरेंद्रसिंघ खंडाळे, सोहेल कच्छी हे सभासद ह्या प्रसंगी उपस्थित होते.
दडपण झुगारून विजय मिळवू -अनिकेत किनगे
तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम अशा संघांमधील ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दडपण तर आहेच पण अश्या स्पर्धा ह्याच आपला कस सिद्ध करण्याचे खरे व्यासपीठ असते. दडपण झुगारून देत संपूर्ण भारतातीतील रोबोटिक्स कम्युनिटीच्या अपेक्षांवर गाडगेबाबांच्या आशीर्वादाने खरे उतरण्याचा विश्वास या प्रसंगी अनिकेत किनगे याने व्यक्त केला. दरम्यान, स्पर्धेत अमेरीकेतून सहा स्पर्धक, इंग्लंडमधून पाच स्पर्धक, न्यूझीलंड येथून तीन स्पर्धक, कॅनडा आणि चीनचे दोन स्पर्धक तर भारतातून निवड झालेला ब्लँका बोट्झ हा गाडगेबाबातील अनिकेत किनगेच्या नेतृत्वाखालील एकमेव संघ आहे, असे ब्लँका बोट्झ चा कर्णधार अक्षय जोशी याने सांगितले. दम्रम्यान, परस्पर सहकार्य, उत्कृष्ठ संघ बांधणी, नेतृत्व गुण आणि समन्वय याचे ब्लँका बोट्झ संघ हे उत्कृष्ठ उदाहरण आहे., असे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले. प्रसंगी अॅकेडमीक डीन डॉ.राहुल बारजिभे, प्रा.नितीन खंडारे, प्रा.जे.एस.चौधरी, प्रा.जी.सी.जाधव उपस्थित होते.
