मैत्रेय संदर्भात उद्या मुंबई मंत्रालयात बैठक : ठेवीदारांच्या आशा पल्लवीत
पाचोरा : राज्यासह देशभरातील सुमारे 20 लाख ठेवीदारांकडील कोट्यवधी रुपयांची रक्कम मैत्रेय कंपनीत गेल्या काही वर्षांपासून अडकली आहे. ठेवीची रक्कम नेमकी कधी मिळेल ? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. कष्टकष्टांनी पै अन् पै मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड कंस्ट्रक्शन प्रा.लि., मैत्रेय रिएक्टर्स अॅण्ड कंट्रक्शन प्रा.लि. कंपनीत गुंतवला आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी 2016 पासून पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांनी आतापर्यंत अनेकदा पाठपुरावा केला आहे. दरम्यान, बुधवार, 7 रोजी देखील मुंबईम मैत्रेयसंदर्भात बैठक होत असल्याने या बैठकीकडे राज्यभरातील गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.
आज मुंबईत बैैठक : निर्णयाकडे लागले लक्ष
बुधवार, 7 रोजी दुपारी 12.45 वाजता मुंबई मंत्रालयातील तिसर्या मजल्यावरील विस्तारीत इमारतीच्या दालन क्र.319 येथे बैठकीचे आयोजन
करण्यात आले आहे. प्रसंगी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपास्थिती असणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या परताव्या संदर्भात चर्चा होणार आहे. दरम्यान, 12 जानेवारी 2021 रोजी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मैत्रेय बाबत बैठक घेऊन संबंधितांना निर्देश दिल्याने या काळात नेमकी काय कारवाई करण्यात आली ? हेदेखील उद्याच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. या बैठकीला नाशिक पोलीस आयुक्त, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त तसेच मैत्रेय गु्रपचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजते.
आमदार पाटील गुंतवणूकदारांची बाजू मांडणार
मैत्रेयमधील गुंतवणूकदारांना आपल्या हक्काच्या पैशांचा परतावा मिळण्यासाठी बुधवारच्या बैठकीत पाचोर्याचे आमदार किशोर पाटील हे पुन्हा आक्रमकपणे बाजू मांडणार आहेत.